
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी असणारे डॉक्टरच निवडणुकीसाठी मतदान करू शकणार आहेत. तसेच आपण डॉक्टरांना नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी मुदत दिली होती असा दावाही केला आहे. त्यामुळे तब्बल 70 हजार डॉक्टर मतदानापासून वंचित राहणार आहेत, मात्र आता नोंदणी नसलेल्या डॉक्टरांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्याचे आणि निवडणूक सुट्टीच्या दिवशी होणार नाही याबाबत लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत. आज वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकाऱयांच्या बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली.
हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनलच्या नेतृत्वात डॉक्टरांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीबाबतची सद्यस्थिती मांडली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सकाळी साडेअकरा वाजता मंत्रालयात सर्व अधिकाऱयांची बैठक बोलावली. बैठकीला वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे संचालक, निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे निबंधक उपस्थित होते. बैठकीत डॉक्टरांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली.
गडबड घोटाळय़ात निवडणूक कशी होणार?
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत इतक्या मोठय़ा प्रमाणावर अनियमितता असतील तसेच तब्बल 70 हजार डॉक्टरांच्या नावाचा घोटाळा असेल तर निवडणूक कशी घेता येईल, असा सवाल बैठकीत उपस्थित एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केला. दरम्यान, याप्रकरणी दोन ते तीन दिवस चर्चा झाल्यानंतर निवडणुकीच्या तिढय़ाबद्दल मार्ग काढण्यात येईल. निर्णय सकारात्मक होईल अशी आशा असल्याचे हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनलचे समन्वयक डॉ. तुषार जगताप यांनी सांगितले