डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर अखेर गुन्हा, गर्भवती मृत्युप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका

पैशांअभावी गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न केल्याप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार ससूनच्या अहवालानुसार डॉ. घैसास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 नुसार 106 (1) अन्वये अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गर्भवती तनिषा भिसे यांना कुटुंबीयांनी 21 मार्चला विमानगरमधील इंदिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना 28 मार्चला त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यानुसार डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, मुदतपूर्व बाळंतपण करावे लागणार असल्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला. त्यानुसार तिला खराडीतील मदरहुड रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, तनिषावर काही महिन्यांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी उपचार केले होते.

त्याअनुषंगाने कुटुंबीयांनी तिला मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉ. घैसास यांनी तपासणी केली असता, तिचा बीपी वाढला होता. मुदतपूर्व प्रसूतीनंतर बाळांना आयसीयूमध्ये ठेवावे लागणार होते. त्यासाठी प्रत्येकी बाळाला 10 लाख रुपये असे 20 लाख रूपये जमा करण्याचे डॉ. घैसास यांनी सांगितले. आम्ही पैशांचे पाहतो, तुम्ही उपचार सुरू करा, असे कुटुंबीयांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तुमच्याकडून होत नसल्यास ससूनमध्ये जा, असे सांगितले.

मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे कुटुंबीयांना जोपर्यंत 10 लाख रुपये जमा करणार नाहीत, तोपर्यंत उपचार करणार नाही, अशी भूमिका घेतली. महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला पह्न केला, तरीही रुग्णालयाने त्यांचे ऐकले नाही. तब्बल 5 तास उपचार करण्यासाठी कोणीही आले नाही. त्यानंतर तिला कुटूंबीयांनी वाकडमधील सूर्या रुग्णालयात दाखल केले. 29 मार्चला सकाळच्या सुमारास तनिषाने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तिची तब्येत खालावली. त्यामुळे तिला तातडीने कार्डियाक स्पेशल मणिपाल हॉस्पिटल बाणेरला हलविले. 31 मार्चला रात्री 12 वाजता तनिषाचा मृत्यू झाला.

डॉ. सुश्रुत घैसास यांनी गर्भवती क्रिटीकल असतानाही तिच्यावर उपचार केले नाहीत. पैशांसाठी तिच्यासह कुटुंबीयांना वेठीस धरले. उपचाराला उशीर केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी ससून रूग्णालयाच्या चौकशी समितीने 19 एप्रिलला अहवाल दिला आहे. अहवालानुसार गर्भवतीची अतिजोखमीची प्रसूती असतानाही तिला रुग्णालयात भरती करून घेतले नाही. डॉ. घैसास यांच्याकडून असंवेदनशीलतेचा आणि वैद्यकीय हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचे ससून अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने प्रियंका अक्षय पाटे यांच्या तक्रारीनुसार डॉ. घैसास यांच्याविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गर्भवतीच्या मृत्युप्रकरणी पुणे पोलिसांनी ससून प्रशासनाचा नव्याने अभिप्राय मागविला होता. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. संबंधित अहवालात डॉक्टरांचा मेडिकल निगलिजन्स असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

ससूनच्या दुसऱ्या अहवालानुसार गुन्हा

पोलिसांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे अहवाल मागितला होता. त्यानुसार समितीने नुकताच अहवाल सादर केला होता. मात्र, कमिटीच्या अहवालानुसार नेमका दोष कोणाचा, याचा बोध पोलिसांना झाला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी नव्याने चार मुद्दय़ांसंदर्भात ससूनकडे पुन्हा अभिप्राय मागितला होता. संबंधित अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा अभ्यास केला. त्याअनुषंगाने डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवला.