प्रासंगिक – ‘अभया’ संस्थेची दशकपूर्ती आणि वाटचाल

>> डॉ. नीलम ताटके

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हा प्रश्न जाणवत नसे, परंतु औद्योगिकीकरण, नागरीकरण झाले. पाश्चात्त्य जीवनशैलीचा परिणाम, व्यक्तिस्वातंत्र्य वाढले. स्त्रियांचे शिक्षण, अर्थार्जन, स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे या गोष्टी वाढत गेल्या. त्यामुळे कधी घटस्पह्ट तर कधी पतीचे अकाली निधन, तर कधी एखाद्याच्या हटवादीपणामुळे वेगळे व्हावे लागते, तर कधी आयुष्याची दिशा वेगळी म्हणून विचारपूर्वक अविवाहित, पर्यायाने एकटे राहणे पसंत केले जाते.

काळ बदलला, खरोखरच बदलला आणि विशेषतः शहरी भागात एकटय़ा माणसाचे जिणे सुसह्य होऊ लागले. तरीही स्त्रियांचे आयुष्य तितकेसे सुसह्य नव्हते. कारण सिनेमाला जाणे, बागेत फिरणे, रोजच्या जीवनात बदल म्हणून जवळपास सहलीला जाणे हे एकटी स्त्री नक्की करू शकत नाही. हे सर्व जाणून वंचित विकास संस्थेच्या चाफेकर सरांनी एकल महिलांचा गट स्थापन करून त्याचे ‘अभया’ असे नामकरण केले. 1 मे 2024 ला ‘अभया गटा’ची दशकपूर्ती झाली.

‘अभया’ची पहिली मीटिंग आजही आठवते. ती होती पर्वतीवर. पुण्यात राहून पर्वतीवर जायला जमत नव्हते, पण ती रम्य संध्याकाळ, अनेक मैत्रिणी एकमेकाRना भेटल्या. अगदी या हृदयीचे त्या हृदयी… इतकं कुणीतरी आपलं भेटल्यासारखं वाटलं आणि हे मैत्र सुरू झालं. तेव्हा लक्षात आले की, काही जणी कुटुंबात राहूनही इतरांशी फारसा संवाद नसल्याने एकटय़ा आहेत.

चाफेकर सरांनंतर मीनाताई कुर्लेकर आणि मीनाक्षी नवले ‘अभया’ची धुरा सांभाळत आहेत, तीही अगदी यशस्वीपणे. त्यांनी एक छान रिवाज केला आहे. गटात आल्यावर स्वतःची ओळख करून देताना फक्त नाव सांगायचे. नावाआधी ‘सौ.’, ‘कु.’, ‘श्रीमती’ असे सांगायचे नाही. नवरा, मुले यांच्याविषयी सांगायचे नाही. त्यामुळे ‘अभया’ मोकळेपणाने बोलू लागल्या.

थोडा पाऊस पडून गेला की, ‘अभया’ना सहलीचे वेध लागतात. दरवर्षी नव्या ठिकाणी सहल पावसाचा आनंद आणि गप्पा, गाणी, धिंगाणा व लहानपण पुन्हा अनुभवायचे. पुण्याजवळ एक दिवसीय पिकनिक होते. चातुर्मासात देवदर्शनासाठी पुण्याजवळ जायचं. देवदर्शनाने मन तृप्त होते. आपले सणवार कुटुंबासोबत साजरे केले जातात. आपलं कुणी नाही म्हणून अभयाचे मन खट्टू होऊ नये यासाठी सणवार एकत्र साजरे केले जातात, त्याची मजा औरच असते. अभयाने दिवाळी, संक्रांत, नवरात्र उत्सव उत्साहाने साजरे केले आहेत. ‘अभया’ची आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची यासाठी गुंतवणूक ते इच्छापत्र याविषयी मार्गदर्शन केले होते. एकटेपण कसे पेलायचे याविषयी कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. यामध्ये चर्चा, संवाद साधला आणि नवी दिशा मिळाली. तीन, चार जणींचे गट होऊन लांबच्या प्रवासाला जातात. कोरोना काळात अभयाच्या भेटीला थोडी खीळ बसली. तरी व्हॉटस्अॅपवर व्यक्त होत होत्या. लॉकडाऊन संपले आणि प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळू लागला.

अनेक स्त्रियांचे आयुष्य संघर्षमय असते. ‘अभया’ने त्यांच्या संघर्षाला सलाम करून ‘अभया सन्मान व मानपत्र’ प्रदान केले जाते. नवरात्र उत्सवात केवळ दांडिया न खेळता विविध क्षेत्रांतील नवदुर्गांचा सन्मान केला जातो. त्यांचे अनुभव ऐकणे, त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणे, त्यांच्याकडून प्रेरणा घेणे असा छान कार्यक्रम आयोजित केला जातो. एकट्या स्त्रीला वाईट शब्दात हिणवले जाते. ते टाळण्यासाठी संस्थेने त्या स्त्रियांना ‘अभया’ असे संबोधले जावे म्हणून राज्य सरकारकडे मागणे मांडून मान्य करून घेतले. 25 मे रोजी ‘अभया’चा दशकपूर्ती कार्यक्रम झाला. ज्यात ‘अभया’च्या अनुभवाचे पुस्तक प्रकाशित झाले. काही ‘अभयां’चा सन्मानदेखील केला गेला. ‘अभया’ची ही वाटचाल पुढेही अशीच सुरू राहील, यात शंका नाही.

[email protected]