Saree Draping Tips- साडी नेसताना तुम्हीसुद्धा या चुका करताय का! साडीत स्टायलिश दिसण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा

हिंदुस्थानी पोशाख म्हणून साडी आजही लोकप्रिय आहे. साडी नेसल्यावर अतिशय आकर्षक लूक प्राप्त होतो. अलिकडे केवळ भारतातच नाही तर, परदेशातही महिलांना साड्या नेसायला आवडायला लागले आहे. पण कधीकधी असे होते की, साडी नेसल्यानंतर हवा तसा लूक मात्र मिळत नाही. यामागे त्या साडीचा दोष नसतो, तर ती कशी नेसली आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

बहुतेकदा असे दिसून येते की, महिला साडी नेसताना अनेक चुका करतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण लूक खराब होतो. साडी नीट नेसता येत नाही, म्हणून अनेकजणी साडी नेसण्याचे टाळतात. तुम्हालाही साडी नेसताना अडचणी येत असतील तर, आता बिनधास्त रहा. साडी नेसताना कोणत्या चुका टाळायला हव्यात हे आपण बघुया. साडी नेसताना कोणत्या चुका करु नये हे कळल्यावर, तुम्हीसुद्धा साडी नेसताना या चुका करणार नाही.

साडी नेसताना कोणत्या चुका करु नये?

बरेचदा साडी नेसताना ती अतिशय वर किंवा खाली खोचली जाते. त्यामुळे कंबरेखालील भाग हा नीट दिसत नाही. साडी नेसताना ती, बेंबीच्या खाली असायला हवी आणि साडीचा पदर मध्यभागातून खांद्यापर्यंत यायला हवा.

साडी नेसण्याआधी तुम्ही जी चप्पल घालणार आहात ती घालूनच साडी नेसायला घ्या. म्हणजे उंचीचा प्राॅब्लेम येणार नाही. चप्पल घातल्यानंतर साडी खाली खेचल्यास पूर्ण साडीचा लूक बिघडतो. म्हणूनच साडी नेसण्याआधी चप्पल घालावी आणि मगच साडी नेसावी.

एक साधा ब्लाउज तुमच्या साडीचा संपूर्ण लूक बदलू शकतो. तुम्ही ब्लाउज कोणत्याही डिझाइनमध्ये शिवून घेऊ शकता, परंतु लक्षात ठेवा की ते खूप घट्ट किंवा सैल नसावे. विशेषतः तुम्ही सिल्क साडी किंवा हेवी साडी नेसली असेल तर, ब्लाऊजही काॅन्ट्रास्ट असायला हवा. ढगळ ब्लाऊज घालून चालणार नाही.

साडी नेसताना पेटीकोट देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमचा पेटीकोट साडीच्या लांबीशी जुळणे खूप महत्वाचे आहे. पेटीकोटची लांबी कमी असेल तर तुमचे पाय त्यात दिसतील. समजा लांब पेटीकोट असेल तर, साडीबाहेर पेटीकोट डोकावेल. पारदर्शक आणि जाळीदार साडीसोबत साडीशी जुळणाऱ्या रंगाचा चमकदार पेटीकोट निवडणे खूप महत्वाचे आहे.