Machine Coffee- तुम्हीसुद्धा पिताय का! मशीन काॅफी किती प्रमाणात प्यायला हवी, वाचा सविस्तर

आपल्यापैकी बहुतेक जणांचा दिवस हा कॉफी मशीनने सुरू होतो. अनेकांना सकाळी मशीनच्या कॉफीची इतकी सवय झाली असते की, विचारता सोय नाही. सकाळच्या बैठकीपूर्वी असो किंवा दुपारी, बहुतेक लोक ऑफिस मशीनमधून कॉफी पितात. परंतु त्यामुळे आपल्या आरोग्याला गंभीर परीणामांना सामोरं जावं लागणार आहे हे आपण विसरुन गेलोय. एका नवीन संशोधनातून धक्कादायक खुलासा झाला आहे. मशीन कॉफी आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत, मशीनमधून कॉफी पिण्यामुळे होणारे नुकसान जाणून घेणे महत्वाचे आहे.

कॉफीमुळे ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल वाढू शकते
स्वीडनमध्ये करण्यात आलेला हा अभ्यास न्यूट्रिशन, मेटाबोलिझम अँड कार्डिओव्हस्कुलर डिसीजेस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, कॉफी मशीनमधून मिळणाऱ्या कॉफीमध्ये असे काही घटक आढळतात, जे शरीरात ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल वाढवू शकतात. या घटकांची नावे कॅफेस्टोल आणि काहवेओल आहेत. ही नावे विचित्र वाटतील, पण त्यांचा थेट हृदयावर परिणाम होतो.

 

संशोधनात असेही आढळून आले आहे की, आठवड्यातून फक्त तीन वेळा मशीन कॉफीऐवजी पेपर फिल्टर कॉफी पित असाल तर, त्यांच्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी हळूहळू कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की तुम्ही छोट्या सवयी बदलून तुमच्या हृदयाची काळजी घेऊ शकता.

या अभ्यासाच्या निकषांपासून कार्यालय व्यवस्थापनानेही धडा घेतला पाहिजे. कदाचित ऑफिसमध्ये चांगली फिल्टर कॉफी मशीन आणण्याची सोय करुन द्यावी. याकरता कॉफी सोडण्याची आवश्यकता नाही, परंतु ती घेण्याची पद्धत सुधारणे हे आता अधिक गरजेचे झालेले आहे.

 

 

 

वैद्यकीय तज्ञ काय म्हणतात?
वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की संतुलित प्रमाणात कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे टाइप २ मधुमेह, अल्झायमर आणि यकृताशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही घरी बनवलेली कॉफी पिऊ शकता किंवा दुकानात बनवलेली कॉफी खरेदी करू शकता. मशीन कॉफीपासून दूर राहून तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.