
योग आपल्या शरीरासोबतच मनालाही निरोगी ठेवण्यास मदत करतो. सूर्यनमस्कारात, सर्व १२ आसने एकत्र केली जातात. म्हणूनच सूर्यनमस्कार आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलेला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या शरीराची काळजी घेणे विसरतो. ताणतणाव, थकवा, शरीरदुखी, शरीरात ऊर्जेचा अभाव या गोष्टी लोकांसाठी सामान्य झाल्या आहेत. आरोग्य चांगले असेल तर सर्व काही ठीक आहे, परंतु आपण इतर गोष्टींमध्ये इतके व्यस्त होतो की आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या धावपळीच्या आयुष्यातून अर्धा तास स्वतःच्या आरोग्यासाठी काढावा लागेल. किमान महिनाभर सूर्यनमस्कार केल्याचे काय फायदे होतील हे आपण बघुया.
सूर्यनमस्काराचे असंख्य फायदे
उन्हाळ्यात दररोज सूर्यनमस्कार केले तर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणताही आजार होणार नाही. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता, आम्लता, अपचन यासारख्या समस्या येत नाहीत आणि तुमची पचनसंस्था निरोगी राहते.
चेहरा उन्हामुळे, धूळ आणि मातीमुळे निस्तेज झाला असेल तर, सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करा. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.
उन्हाळ्यात आपल्याला अनेकदा थकवा जाणवतो. त्यामुळे रक्तदाब कमी होणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून सूर्यनमस्कार करावा, असे केल्याने आपल्या शरीरात उर्जेची कमतरता भासत नाही आणि आपले आरोग्यही चांगले राहते.
सूर्यनमस्कार करताना शरीराचे अंतर्गत अवयव ताणले जातात. असे केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी देखील कमी होते.
महिलांना दर महिन्याला मासिक पाळीचा सामना करावा लागतो. या काळात काही महिलांना तीव्र वेदना होतात, म्हणून नियमितपणे सूर्यनमस्कार करणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार करण्यामुळे आपले हार्मोन्स संतुलित राहतील आणि मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळेल.
तुमचे मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही समस्येतून बाहेर पडू शकता. मानसिक आरोग्य चांगले असणे खूप महत्वाचे आहे. चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी, नियमितपणे सूर्यनमस्काराचा सराव केला पाहिजे.