
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला असून अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या डीपफेक व्हिडीओमध्ये ती सांगते की, ’नमस्कार, मी तुमची आवडती विद्या बालन आहे. आज मी तुम्हाला…’. त्यावर लाल रंगांनी फुली मारून ’स्पॅम अलर्ट’ असे लिहिले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांना हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगत अशा व्हिडीओंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मी दिसत आहे. हे व्हिडीओ खोटे असून एआय निर्मित आहेत. माझा या व्हिडीओंशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की, व्हिडीओ शेअर करण्याआधी त्यामध्ये असलेल्या माहितीची पडताळणी करा. एआयने बनवलेले व्हिडीओ दिशाभूल करणारे असतात, असे विद्याने सांगितले.