मुलींच्या शिक्षणावर निर्बंध घालणाऱ्या तालिबानचा प्रतिकार करा; मलाला युसूफझाई यांचे मुस्लिम नेत्यांना आवाहन

महिला आणि मुलींच्या शिक्षणावर निर्बंध घालत असलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचा सर्वांनी प्रतिकार करा, असे आवाहन नोबेल शांतता पारितोषिकप्राप्त मलाला युसूफझाई यांनी आज मुस्लिम नेत्यांना केले. तालिबानच्या निर्बंधांना कायदेशीर ठरवू नका, असेही त्यांनी सांगितले. इस्लामाबाद येथे मुलींच्या शिक्षणाच्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी जमलेल्या मुस्लिमबहुल राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना मलाला यांनी तालिबानला फटकारले.

मुलींच्या शिक्षणाचे समर्थन करणाऱया मलाला 2012 मध्ये पाकिस्तानी तालिबानच्या हल्ल्यात वाचल्या होत्या. तालिबानच्या या धोरणाला विरोध करून मुस्लिम नेते खरे नेतृत्व दाखवू शकतात. तालिबान महिलांना माणूस म्हणून पाहत नाही असेच म्हणता येईल, असे सांगताना मलाला यांनी तालिबानच्या अफगाण महिलांच्या हक्कांच्या दडपशाहीचा निषेध केला. दरम्यान, या कार्यक्रमाचे निमंत्रण असतानाही तालिबानचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले. तसेच मलाला यांचे वडील झियाउद्दीन यांनी मुस्लिम राष्ट्रांनी तालिबानवर कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त केली. 2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता मिळाल्यापासून तालिबानने महिला आणि मुलींवर कठोर निर्बंध लादले आहेत.

मलाला युसूफझाई यांना 2012 मध्ये पाकिस्तानमधील तालिबानच्या दहशतवाद्यांनी गोळी मारली होती. मात्र गोळी लागूनही मलाला यांनी आपला लढा कायम ठेवत तालिबानविरोधात भूमिका घेतली. पाकिस्तानचे शिक्षण मंत्री खालिद सिद्दीकी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानला आमंत्रण देऊनही त्यांचा एकही प्रतिनिधी आला नाही. मुलींसाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचा सूर या संमेलनातून उमटला.