दहिसर जकात नाक्याची जागा,धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देऊ नका

मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभागातील दहिसर जकात नाक्याची जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे, मात्र असे झाल्यास आधीच पायाभूत सुविधांसाठी रखडलेल्या दहिसरकरांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे दहिसर जकात नाक्याची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देऊ नका, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना उपनेते व म्हाडाचे माजी सभापती विनोद घोसाळकर यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना पत्र दिले आहे.

दहिसर चेकनाका येथे जकात नाका बंद झाला आहे. या परिसरातील मुंबई महानगरपालिकेची 6 एकर जागा मोकळी असून ही जागा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी धारावी प्रकल्पासाठी संपादन करण्याची मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना विनोद घोसाळकर म्हणाले की, दहिसर चेकनाक्यावरील पश्चिम द्रुतमार्गावरून ठाणे, पालघर, डहाणू व गुजरात राज्यातून नागरिक मोठय़ा प्रमाणात प्रवास करतात. हा मार्ग वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्यामुळे चेकनाक्यावर नेहमी मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. मालवाहतूक ट्रकदेखील याच मार्गाने येत असतात. तसेच याच मार्गावरून ठाणे जिह्यातून अनेक रुग्ण हे मुंबईत उपचारासाठी येत असतात, पण येथे होणाऱया वाहतूककोंडीमुळे दक्षिण मुंबईतील रुग्णालयांत पोहचायला त्यांना नेहमी तीन तास वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी के.ई.एम. रुग्णालयाच्या धर्तीवर येथे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी पालिकेकडे केलेली आहे. बाहेरून येणाऱ्या बस, ट्रक, चारचाकी वाहनांसाठी अद्ययावत पार्किंग टर्मिनल व्हावे, अशीसुद्धा मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. अशा परिस्थितीत जर येथे धारावी पुनर्वसन प्रकल्पाला जागा दिली तर परिस्थिती मोठय़ा प्रमाणात बिघडेल.