वादळी वाऱ्याचा धसका; दोन महिने होर्डिंगवर जाहिरात करु नका,महापालिकेचा होर्डिंगधारकांना आदेश

आगामी काही दिवसांत जोरदार वादळी वारे, अवकाळी पाऊस आदींमुळे जाहिरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील सर्व होर्डिंगवर 15 एप्रिल ते 15 जून या दोन महिने कालावधीत जाहिरात बॅनर लावू नका, असा आदेश महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंगधारकांना दिला आहे.

नेत्यांचे वाढदिवस असो, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक यांसह कोणतेही कार्यक्रम असो, होर्डिंगवर जाहिरात केली जाते. अनेकजण होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेत नसल्याचे वेळोवेळी समोर आले. अशा होर्डिंगधारकांवर महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले असून, ‘एआय’ सारख्या तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केला जात आहे. शहरातील किवळे येथे 17 एप्रिल 2023 रोजी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील 174174 अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त केली. शहरात सद्यस्थितीत सुमारे एक हजार ४०० होर्डिंग्ज अधिकृत असल्याचा दावा आकाश चिन्ह व परवाना विभागाने केला आहे. किवळे दुर्घटनेनंतर प्रशासनाने होर्डिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. असे असले तरी होर्डिंग्जधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.

शहरातील जाहिरात होर्डिंगचालक व धारक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत झाली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग्ज कोसळून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या १५ एप्रिल ते १५ जून असे दोन महिने होर्डिंग्जवर जाहिरात बॅनर न लावण्याचा सूचना होर्डिंगचालकांना दिल्या आहेत. त्याकाळात होर्डिंग्ज रिकामे ठेवण्यात यावेत. होर्डिंगचे लोखंडी स्ट्रक्चर आणि फाऊंडेशन खराब असल्यास ते तत्काळ दुरुस्ती करून घ्यावे. होर्डिंग फाऊंडेशनची तपासणी करून होर्डिंग सुरक्षित करण्यासाठी लॉकची व्यवस्था करावी, अशा सूचना आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी होर्डिंग्जधारकांना दिल्या आहेत.

स्ट्रक्चर सर्टिफिकेट फक्त कॉपी-पेस्ट होर्डिंग्जचालकांनी बैठकीत अनेक तक्रारी केल्या. अनेक स्ट्रक्चर सर्टिफिकेट फक्त कॉपी-पेस्ट स्वरूपात दिले जात आहे. शासनाने स्पष्ट अटी दिल्याने होर्डिंगवरील मोजमाप, उंची, स्थिरतेबाबत नियमबद्ध तपासणी आवश्यक आहे. चाळीस फुटांपेक्षा उंच होर्डिंग्ज आणि ३० बाय ४० फुटांपेक्षा मोठ्या जाहिरातींवर कारवाई होत नाही. होर्डिंगचे मोजमाप आणि तपशील ४ बाय ३ फुटांच्या पाटीवर लिहिणे बंधनकारक असूनही, त्याचे पालन होत नाही. पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस वर्षांपूर्वीची किती जाहिरात होर्डिंग्ज आहेत, याची माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. ई-मेल, व्हॉट्सअॅपवरील तक्रारीला उत्तर दिले जात नाही. होर्डिंग्जचालकांना महसूल, उद्यान व क्षेत्रीय कार्यालयांकडून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशा तक्रारी पुढे आल्या. होर्डिंगचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

प्रमाणपत्र देण्यास सीओईपीचा नकार

किवळेतील दुर्घटनेनंतर शहरात नवीन होर्डिंग्ज उभारण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) या संस्थेच्या स्टॅबिलिटी प्रमाणपत्राची अट बंधनकारक केली होती. यामध्ये बराच कालावधी जात होता. त्यामुळे होर्डिंगधारकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता सीओपीनेच स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. महापालिकेच्या अभियंत्यांकडूनच स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पावसाळ्यापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय यावर्षी प्रथमच १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत होर्डिंगवर जाहिरात न लावता ते रिकामे ठेवावेत, होर्डिंगचे स्ट्रक्चर खराब झाले असल्यास ते तातडीने दुरुस्त करून घ्यावे, असा सूचना होर्डिंगचालक व मालकांना दिल्या आहेत.

– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग