पाथर्डीच्या ज्ञानेश्वर मुखेरकरने लावला अटकेपार झेंडा! UPSC परीक्षेत मिळवला 707 वा रँक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तालुक्यातील मुखेकरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर बबन मुखेकर याने 707 वी रँक मिळवत तालुक्याचा झेंडा अटकेपार फडकावला.

राज्यात पाथर्डी तालुक्याची ओळख ही ऊसतोड मजुरांचा व दुष्काळी तालुका म्हणून असली, तरीही सध्या प्रशासकीय सेवेत असलेल्या तालुक्यातील अनेकांनी ही ओळख पुसण्याचे काम गेल्या काही वर्षांत केले आहे. या सनदी अधिकाऱ्यांच्या नावात आता ज्ञानेश्वर मुखेरकर नावाची भर पडली.

ज्ञानेश्वर यांचे वडील केवळ एक एकर जमीन कसत असून, आई सुनीता या अंगणवाडीसेविका म्हणून काम करत आहेत. मुखेकर यांचे प्राथमिक शिक्षण मुखेकरवाडीत, तर माध्यमिकचे शिक्षण तालुक्यातील कोरडगाव येथे झाले आहे. अहिल्यानगर येथील पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिकल्यानंतर पुणे येथील एका कॉलेजमध्ये त्यांनी पदवी घेतली. सध्या मुखेकर हे पुणे येथे शासकीय सेवेत श्रेणी एक वर्गात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूवींही त्यांनी दोनवेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली होती.

माझ्या यशात कुटुंबाचा, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा तसेच माझे मार्गदर्शक प्रा. प्रवीण चव्हाण व नेहमी प्रेरणा देणाऱ्या मित्रांचा वाटा असल्याची भावना मुखेरकर यांनी व्यक्त केली.

मेंढपाळाच्या मुलाचा लोकसेवा आयोग परीक्षेत डंका; यमगेच्या बिरदेव डोणे याला 551 वी रँक, कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी

संकेत शिंगटे याने खोवला मर्देच्या शिरपेचात मानाचा तुरा

मर्डे गावचा सुपुत्र संकेत अरविंद शिंगटे याने ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात 479 वा क्रमांक मिळवत मर्हेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संकेतचे वडील अरविंद शिंगटे हे किसनवीर साखर कारखान्यात लेबर ऑफिसर असून, आई जयश्री या माजी सरपंच आहेत. संकेतने प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील आर्यन अकॅडमी, तर दहावीचं शिक्षण सेंट पॉल स्कूल, दादर येथून पूर्ण केलं. विद्यालंकार कॉलेज, वडाळा येथून बी.ई. ही पदवी प्राप्त केली. समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, अशी माझ्या कुटुंबीयांची इच्छा होती. हे यश कुटुंबाच्या त्यागाचं आणि पाठिंब्याचं प्रतीक असल्याचे संकेत सांगतो.