Gold smuggling : 267 किलो सोन्याची तस्करी; BJP पदाधिकाऱ्यावर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 267 किलो सोन्याची तस्करी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र हे सोने तस्करी प्रकरण प्रकाशझोतात आल्यानंतर तामिळनाडूत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चेन्नईस्थित भाजप कार्यकर्त्यावर कथित तस्करीत भूमिका बजावल्याचा आरोप द्रमुकचे प्रवक्ते ए सरवणन यांनी केला आहे.

ज्या भाजप कार्यकर्त्याचे नाव घेतले जात आहे तो आता पक्षात नसल्याचा दावा भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे. अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रान्झिट-डिपार्चर भागात असलेल्या एअरहब नावाच्या दुकानात ही तस्करी सुरू होती. याप्रकरणी दुकानाचा मालक मोहम्मद साबीर अली याच्यासह 9 जणांना अटक केली आहे. मोहम्मद साबीर अली हा यूट्युबर आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणासाठी विमानतळावरील व्यावसायिक जागा व्यवस्थापित करण्याचे काम विद्वेदा पीआरजी ही कंपनी करत होती. या कंपनीमार्फत अलीने 70 लाख रुपये देऊन हे दुकान भाड्याने घेतले होते. यात गिफ्ट शॉप सुरू केले होते. अलीने दुकानात काम करत असलेल्या सात कर्मचारी कामाला ठेवले होते. या सर्वांना सोने तस्करीचे ट्रेनिंग दिले होते. परदेशातून आलेले सोने गुद्दाशयात लपवून हे तस्कर विमानतळाबाहेर नेऊन त्याची तस्करी करायचे.

हे कर्मचारी परदेशातून आणलेले सोने संबंधित व्यक्तीकडून बाथरुममध्ये हस्तगत करायचे. मग विमानतळाबाहेर घेऊन जायचे. हे विमानतळावरील कर्मचारी असल्याने त्यांना सुरक्षातपासणीमध्ये सूट मिळाली होती. याचाच फायदा घेत आरोपी बिनदिक्कतपणे तस्करी करत होते. मात्र अखेर सुरक्षारक्षकांच्या तपासात एक आरोपी पकडला गेला आणि या तस्करीचा भांडाफोड झाला. या गँगने दोन महिन्यात 167 कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे तपासात उघड झाले.