गरजूंना ‘स्वामी’ची साथ

परळ येथील ‘स्वामी’ म्हणजे सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अॅण्ड एन्वार्यमेंट या सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गरीब, गरजूंना मदत केली जाते.

‘स्वामी’च्या रुग्ण सेवा पेंद्रामध्ये रुग्णाला उपयोगी पडणारी उपकरणे अल्पदराने भाडय़ाने दिली जातात. कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धान्य वाटप करण्यात येते. रक्त आणि इतर चाचण्या माफक दरात केल्या जातात. आदिवासी रुग्णांसाठी औषधपेढी चालवण्यात येते. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते. व्ही4 ऑर्गन फाऊंडेशन आणि स्वामी यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान किंवा देहदान चळवळ सुरू आहे.

कॅन्सरच्या रुग्णांसोबत दिवाळी
कॅन्सरच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिवाळी साजरा करता यावी म्हणून ‘स्वामी’ संस्था विशेष उपक्रम राबवते. उद्या शनिवारी सायंकाळी 5 वाजता शिरोडकर हॉल, परळ येथे हा कार्यक्रम होईल. याअंतर्गत गाण्यांची मैफल, दिवाळी फराळ, साहित्य वाटप होईल. संपर्क – 8928061391.