>> योगेश जोशी
दिवाळीची चाहूल लागते ती दसऱ्यापासूनच. दसरा आणि दिवाळीचा संबंधाबाबत अनेक कथाही प्रसिद्ध आहेत. दिवाळी सुरु होते ती वसुबारस या दिवसापासून…आपल्या कृषीप्रधान देशात पशुधनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच गोधनाला जास्त महत्त्व आहे. शेतीतील अनेक कामांच बैल उपयोगी पडतो. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्यात येतो. तर गाईबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस निवडणियात आला आहे. यावरून गोधनाचे महत्त्व लक्षात येते. आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्सद्वादशी असेही म्हणतात. या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. तसेच या दिवसापासूनच दिवाळी सणाची सुरुवात होते.
वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज म्हणजे दिवाळी सण. या सणाची सुरुवात वसुबारसपासून होते. याच दिवशी अंधराकडून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक म्हणून आकाशकंदील लावण्यात येतो. घरासमोर रांगोळी काढत पणत्या लावण्यात येतात. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. गायीबाबत कृतज्ञता म्हणून या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. गोधनासाठी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतात.
वसुबारसच्या सणाची आख्यायिका समुंद्रमंथनाच्या कथेशी जोडलेली आहे. समुद्रमंथनातून कामधेनूही उत्पन्न झाली होती. कामधेनू म्हणजे मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी, मनोकामाना पुरवणारी, धनन्यधान्य संपन्नता देणारी आहे. त्यामुळे यादिवशी गायवासराची पूजा केली जाते. गाय वासरांना स्नान घालत त्यांच्या अंगाला हळद लावली जाते. त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. त्यांना प्रदक्षिणा घालावी.
यंदा सोमवारी 28 ऑक्टोबरला अश्विन कृष्ण एकादशीला रमा एकादशी आणि वसुबारस आहे. एकाच दिवशी एकादशी आणि वसुबारस आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण हिंदुस्थानातही वसु बारस साजरी केली जाते. महाराष्ट्रात वसुबारस, गोवत्स द्वादशी असे म्हणतात. तर दक्षिण हिंदुस्थानात कामदेनूपैकी एक असलेल्या नंदिनी या धेनूच्या नावाने हे व्रत म्हणून साजरे केले जाते.