दिवाळीच्या आधी येणारी रमा एकादशी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजाविधी…

>> योगेश जोशी

आपल्या संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तमसो मा ज्योर्तिगमय! म्हणजे अंधरातून प्रकाशाकडे जाण्याचा सण. नवचैतन्य, उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव अशई दिवाळी सणाची ओळख आहे. या काळात सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण असते. आपले सण-उत्सव निसर्गाशी नाते सांगणारे आहेत. दिवाळी आणि निसर्गाचाही असाच संबंध आहे. तसेच दिवाळीआधी येणाऱ्या रमा एकादशीचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जाणून घेऊया या व्रताची कथा, महत्त्व आणि पूजाविधी…

दिवाळीच्या एक दिवस आधी येणारी एकादशी पवित्र, अत्यंत शुभ, धन, समृद्धी आणि वैभव देणारी मानली जाते. अश्विन महिन्यात पहिली म्हणजे शुद्ध पक्षात दसऱ्यानंतर येणारी एकादशी ही पाशांकुशा एकादशी म्हणून ओळखली जाते. तर अश्विन कृष्ण पक्षात येणारी एकादाशी रमा एकादशी नावाने ओळखली जाते. दिवाळीच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे या एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. तसेच चातुर्मासाची सांगता होण्यापूर्वीची ही एकादशी असल्यामुळे तसेच दिवाळीची सुरूवात होण्याआधी येत रमा एकादशी महत्त्वाची मानण्यात येते.

वर्षभरातील एकूण 24 एकादशी असतात. प्रत्येक मराठी महिन्यात शुद्ध आणि कृष्ण पक्षाच एक असे मिळून वर्षात 24 एकदाशी येतात. तसेच अधिक मास आल्यास वर्षात एकादशींची संख्या 26 होते. प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशींच्या नावांवरून त्यांचे महत्त्वशी लक्षात येते.

आषाढी, कार्तिकी या दोन एकादशी महत्त्वाच्या मानल्या जातात. तसेच या काळात पंढरपुरात वारकरी येतात. या दोन एकादशींना अनेक शतकांची वारीची परंपरा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक एकदशीचे वेगळे असे महत्त्व आहे. अनेक विठ्ठल, कृष्ण आणि विष्णुभक्त प्रत्येक एकदाशीचा उपवास करतात. तर अनेकजण आषाढी आणि कार्तिकी एकदशीचा उपवास करतात आणि श्रीविष्णूचे पूजन करतात. वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. तर रमा एकादशी ही श्रीविष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या पूजनासाठी ओळखली जाते. या एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. तसेच या एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.

रमा एकदशीचे व्रत करणाऱ्यांनी सुरुवातीला एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा. श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा फोटोची चौरंगावर स्थापना करावी. श्रीकृष्णाचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, मिठाई, खीर यांचा समावेश असावा. त्यानंतर एकादशीची व्रतकथा ऐकावी, अशाप्रकारे या व्रताचा विधी सांगण्यात येतो.

या एकदशीच्या पौराणिक कथेनुसार मुचुकंद नामक महाप्रतापी राजा होता. मुचुकंदच्या कन्येचे नाव चंद्रभागा होते. तिचा विवाह चंद्रसेन राजाचा पुत्र शोभन याच्याशी झाला. शोभनला भूक सहन होत नसे. एकदा दोघे जण मुचुकंद राजाच्या राज्यात फेरफटका मारायला गेले होते, तो दिवस रमा एकादशीचा होता. एकादशी व्रताबाबत चंद्रभागाने शोभनला सांगितले. यानंतर दिवसभर अन्न ग्रहण न करण्याचा निर्णय शोभनने घेतला. मात्र, भूक सहन न झाल्याने तो बेशुद्ध होतो. पतीचे निधन झाले, असे समजून चंद्रभागा वडिलांकडे येते. त्यानंतर ती एकादशीचे मनोभावे व्रत करते. तसेच एकादशीला उपवासाचा केलेला संकल्प पूर्ण केल्याचे शोभनला व्रताचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे त्याला देवपूरचे राज्यही प्राप्त होते.

देवपूर राज्य असीम धन, धान्य, ऐश्वर्य, वैभव यांनी संपन्न असते. त्या गावात एकदा सोम शर्मा नामक व्यक्ती येतो, तो शोभनला ओळखतो आणि त्याला या सर्व प्रकाराबाबत विचारतो. शोभन रमा एकादशीचे व्रत आणि नंतर झालेल्या पुण्य फलाबाबत सांगतो. त्यानंतर सोम शर्मा चंद्रभागेला भेटत याबाबतची माहिती देतो. शोभनची माहिती मिळाल्याने चंद्रभागा देवपूरला जाते आणि शोभन यांची भेट घेते. चंद्रभागा सांगते की, गेली 8 वर्षे नियमितपणे रमा एकादशीचे व्रत केल्याचे जे पुण्य मिळाले आहे, ते सर्व आपणास अर्पण करते. यामुळे देवपूरचे वैभव, ऐश्वर्य, धन, धान्य, संपत्ती स्थिर होते. सर्वजण आनंदाने नांदू लागतात, अशी व्रतकथा सांगितली जाते. त्यामुळे संपन्नता, वैभव आणि सुखप्राप्तीसाठी हे व्रत करण्यात येते, अशी मान्यता आहे.