‘आरोग्यम् धनसंपदा’ जोपासण्याचा सण धनत्रयोदशी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजन…

>> योगेश जोशी

दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून होत असली तर धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. आरोग्य आणि संपत्ती या दोन गोष्टी असदतील तर जीवनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे फक्त धन, संपत्ती महत्त्वाची नसून आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यासाठी यांची सांगड घालत दिवाळीचा हा पहिला दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी देवांचे वैद्य अशी ओळख असणाऱ्या तसेच हातात अमृतकुंभ असलेल्या धन्वंतरीची, संपत्ती आणि सुख देणाऱ्या लक्ष्मीदेवींची आणि देवांचे खजिन्यांचे संरक्षक असलेल्या कुबेराचे पुजन करण्यात येते. तसेच या दिवशी यमदीपदानही करण्यात येते. जाणून घेऊया या सर्वांचे महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धती याबाबतची माहिती.

यंदा धनत्रयोदशी मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान धन्वंतरीचा उत्पत्ती धनत्रयोदशीला झाली, अशी मान्यता असल्याने हा दिवस साजरा करण्यात येतो. भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. ते देवांचे वैद्य असून आयुर्वेदाचे देवता आहे. त्यामुळे या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असेही म्हणातात.

सुख, समाधानाच्या प्राप्तीसाठी आरोग्यासह संपत्तीचीही गरज असते. त्यामुळे या दिवशी धनाची देवता कुबेरासह लक्ष्मी देवीचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. कार आणि दागिने, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करत हे देवी लक्ष्मीचे घरात स्वागत करण्यात येते. त्यामुळे यादिवशी सोन्यासह अनेक वस्तूंची खरेदी करण्यात येते.

धनत्रयोदशीच्या पूजेसाठी एका चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरावे. यानंतर गंगाजल शिंपडून भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची स्थापना करावी. देवासमोर तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती आणि धूप लावावा. देवाला गंध, हळद, कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावी. या दिवशी सोने, चांदी किंवा खरेदी केलेली वस्तू चौरंगावर ठेवत त्यांनाही हळद कुंकू वाहावे. तसेच घरात नेहमी सुख,समृद्धी, संपत्ती आणि धन्वंतरी, कुबेर आणि लक्ष्मी देवीचा कृपाशिर्वाद असावा, अशी प्रार्थना करावी.

धनत्रयोदशीची कथा
धनत्रयोदशीची कथा समुद्र मंथनाशी जोडलेली आहे. दिवाळीची सुरुवात होणारी वसुबारस याचीही कथा समुद्रमंथनाशी जोडलेली आहे. समुद्र मंथनावेळी भगवान धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर आले. त्यावेळी देव आणि असूर अमृत प्राशनासाठी त्यांच्या मागे धावले. त्या झटापटीत अमृताचे काही थेंब पृथ्वीर पडले. ती ठिकाणे तीर्थ म्हणून ओळखली जातात. त्यामुळे या पर्वणीला तीर्थक्षेत्री अनेक भाविक स्नान करतात. त्यानंतर भगवान विष्णुने मोहिनीरुप घेत अमृत कलाशाचा ताबा घेतला आणि धन्वंतरीची सुटका केली. त्यामुळे धन्वंतरी यांची उत्पत्ती झालेला दिवस म्हणून धनत्रयोदशीची ओळख आहे. तसेच आरोग्य प्राप्तीसाठी या दिवशी धन्वतंरी पुजन करण्यात येते.

यमदीपदानाचे महत्त्व
धनत्रयोदशीला यमदीपदानही केले जाते. याबाबत सांगण्यात येणारी आख्यायिका रंजक आहे. हेम राजाचा पुत्राचा सोळाव्या वर्षी अपमृत्यु होणार असल्याची भविष्यवाणी असते. पुत्रावरील अपमृत्येच संकट दूर होण्यासाठी राजा त्याचे ल्गन करून देतो. लग्नानंतर चवथा दिवशी त्याचा मृत्यू होणार असल्याची भविष्यवाणी असते. त्याच्या पत्नीला याबाबत समजताच पतीला या संकटातून बाहेर काढण्याचे ती ठरवते. त्या रात्री ती पतीला झोपू देत नाही. त्याला विविध गोष्टी सांगत अनेक रंजक कथा सांगत त्याला गुतंवण ठेवत ती जागे ठेवते. तसेच त्यांच्या खोलीत सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून सर्वत्र लखलखाट आणि चमचमाट केला जाते. सर्वत्र दिवे लावत राजमहाल प्रकाशमान करण्यात येतो. मोठमोठ्या दिव्यांनी सजावट केली जाते. यमाच्या नोंदीप्रमाणे राजकुमाराचे प्राण हरण्याची वेळ आल्यावर यम दूतांसह येतो. सर्वत्र प्रकाश, लखलखाट असल्याने डोळे दीपल्याने त्याला राजकुमाराच्या खोलीचा मार्ग सापडत नाही. यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या- चांदीने आणि लखलखाटाने दिपतात. त्यामुळे यम राजकुमाराचे प्राण न घेताच यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमारावरील अपमृत्यूचे संकट दूर होते. त्यामुळे या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू येऊ नये, यासाठी धनत्रयोदशीला यमधर्मासाठी घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून दिवा लावतात. यालाच यमदीपदान असे म्हणातात. इतरतवेळी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही करत नाही. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे म-त्यूनंतर दिवा लावतात, त्याचे तोंड दक्षिणेकडे असते. मात्र, अपमृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीला दक्षिण दिशेला दिवा लावल्यास अपमृत्यू टळतो, अशी मान्यता आहे.