
> रविप्रकाश कुलकर्णी
दिवाळीसारखा सण साऱ्या हिंदुस्थानभर साजरा केला जातो. प्रत्येक प्रांताचं ते साजरेपण वेगवेगळं असू शकतं, पण सगळ्याचा मथितार्थ एकच शुद्ध आनंदाची प्राप्ती! मग त्यात गोडधोड येतं, नवी वस्त्रप्रावण येतात. दिवे, पणत्या, आकाशकंदील यांसारख्या गोष्टींनी आसमंत उजळून टाकलं जातं. प्रत्येक गोष्टीचा आनंद वेगळा. या आनंदाबरोबरच महाराष्ट्रात मराठीचं म्हणून एक वेगळेपण आहे. ज्याचं वर्णन हिंदुस्थानी पातळीवरदेखील एकमेव असं करता येईल, ते म्हणजे दिवाळी अंक!
दिवाळी अंक या आनंदाची मुहूर्तमेढ रोवली मासिक ‘मनोरंजना’चे संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी. मासिक ‘मनोरंजना’चा संसार वाचकाश्रय लाभल्यामुळे सुव्यवस्थित चालत असला तरी संपादकांना वाटलं की, वाचकांना काहीतरी वेगळं आणि नवीन द्यायला हवं. त्या कल्पनेतून त्यांनी 1909 मध्ये मासिक ‘मनोरंजना’चा दिवाळीचा अंक सादर केला. या अंकात इतकी विविधता होती की, आजही त्याच्या पलीकडे आपले दिवाळी अंक फारसे गेलेले नाहीत. ही कल्पना वाचकांना आणि लेखकांनादेखील इतकी आवडली की, मासिक ‘मनोरंजना’ला डोळ्यांपुढे ठेवून वेगवेगळे दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागले. नवनवीन लेखकांना एक नवीन व्यासपीठ लाभले. ही कल्पना इतकी रुजली की, आजही ती परंपरा टिकून आहे.
इथे एका गैरसमजाचे निराकरण करायला हवं. द. भी. कुलकर्णी यांच्यासारख्या भल्याभल्या विद्वानांपासून ते अगदी व्हॉट्सअॅप विद्वानांनी समज पसरवलेला आहे की, बंगालमधील दुर्गा पूजेच्या निमित्ताने जे दुर्गा पूजा साहित्य विशेषांक निघतात ते पाहून, त्यातून प्रेरणा घेऊन काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी दिवाळी अंक सुरू केला, पण हे चूक आहे. त्याचं साधं सरळ उत्तर सांगायचं झालं तर, लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला ती प्रेरणा घेऊन बंगालमध्येही सार्वजनिक दुर्गा पूजा सुरू झाली आणि तेव्हापासून दुर्गा पूजा साहित्य विशेषांक सुरू झाले. याबाबत मतभेद नाहीत. पण का. र. मित्र यांचा दिवाळी अंक सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधीपासूनच आहे. एवढय़ावरून दिवाळी अंक सुरू करण्याचं श्रेय त्यांनाच दिलं पाहिजे.
इतिहासाच्या बाबतीत आपण फारच ढिले आणि गाफील राहतो. त्यामुळे आपलं श्रेय बऱ्याचदा दुसऱ्यांकडे जातं. तसं होऊ नये म्हणून हे स्पष्ट केलं. पुन:पुन्हा हे सांगायला हवं. 1909 पासून सुरू झालेली ही दिवाळी अंकांची परंपरा उज्ज्वलपणे आजही महाराष्ट्रात चालू आहे याचा आपल्याला निश्चितच अभिमान असायला हवा.
आज एका दिवाळी अंकाबाबत असाच पाम झालेला आहे. ‘मोहिनी’ दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ! ते हास्यचित्र गेली 72 वर्षं एकच एक चित्रकार म्हणजे शि. द. फडणीस यांनी काढलेलं आहे. त्यात पुन्हा या हास्यचित्रकाराने यंदाच शंभरीत प्रवेश केलेला आहे. असे दुहेरी पाम करणारे ते जगातले एकमेव चित्रकार आहेत. ‘मोहिनी’च्या संपादकाच्या तीन पिढय़ा आणि त्यांचा एकच एक चित्रकार, नव्हे हास्यचित्रकार यांचे एक मुखाने अभिनंदनच करायला हवं. तसंच हा पाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांसारख्या पुस्तकात नोंदवला गेला पाहिजे.
या ठिकाणी आठवण येते ती पामी लेखक गुरुनाथ नाईक यांची. 1200-1100 कादंबऱया लिहून झाल्यानंतर ते म्हणाले होते, “हा एक जागतिक उच्चांक आहे, पण लिम्का वा गिनीजमध्ये त्याची अद्याप नोंद झालेली नाही. कारण माहितगार असा कुणी मला मित्र वा चाहता भेटलाच नाही.” बाबुराव अर्नाळकरांना विभाकर कर्वे भेटले. त्यांनी गिनीज नोंदीसाठी ज्या ज्या गोष्टींची पूर्तता करावी लागते, त्या पूर्ण केल्या आणि बाबुराव अर्नाळकरांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. हे सर्व पाहता एवढंच सांगावंसं वाटतं, शि. द. फडणीस यांच्या बाबतीत असं काही होऊ नये. त्यासंबंधात जाणत्यांनी वेळेत हालचाल करावी.
तर अशी उज्ज्वल परंपरा असलेले दिवाळी अंक आता आलेले आहेत. अर्थात प्रत्येक वाचकाच्या मनात काही दिवाळी अंक घट्ट बसलेले असतात. याचे कारण वर्षानुवर्षे या अंकांनी रसिक वाचकांची मने जिंकलेली असतात. जसे की, ‘मौज’, ‘दीपावली’, ‘श्री दीपलक्ष्मी’, ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’, ‘हेमांगी’, ‘कालनिर्णय’, ‘प्रतिभा’, ‘ऋतुरंग’, ‘चंद्रकांत’, ‘शब्द गंधार’, ‘गंधाली’, ‘अक्षरधारा’, ‘संवादसेतू’, ‘वसंत’, ‘पद्मगंधा’, ‘मेनका’, ‘माहेर’ ही काही नमुन्यादाखल सांगितलेली नावे आहेत. दिवाळी अंकाच्या वाचकांना ती नामस्मरणाप्रमाणे माहीत असतात. याखेरीज सांगोवांगी इतर दिवाळी अंकांत काय आहे हे कळत जातं. मग वाचक त्या अंकाच्या शोधात जातो. ही दिवाळी अंकाची सफर आनंददायक असते. हा वाचनानंद तुम्हाला लाभो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो!