साहित्य जगत – जावे त्याच्या वंशा!

>> रविप्रकाश कुलकर्णी

दिवाळी अंक हा काय प्रकार आहे हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. लेखक, संपादक, चित्रकार ही मंडळी चार-चार महिने राबतात. मग हे सगळे मुद्रकाकडे जाते व चार-सात दिवसांत दिवाळी अंक मुद्रित स्वरूपात दिसायला लागतो. अंक वेळेत आला नाही तर सगळंच गणित कोलमडतं. बागवे, भुतडा यांसारखे वितरक तर म्हणतात की, दसऱयाच्या आधी अंक द्या. मग बघा कसा अंक संपतो ते, पण दसऱ्यापर्यंत अंकाला जाहिरातीच मिळत नाहीत. जाहिरातदार दरवर्षी दिवाळी अंकवाल्यांना झुलवत ठेवतात. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावता येणं शक्य आहे काय? याबाबत संबंधितांशी बोलताना लक्षात येतं की, एकंदरीत हे अवघड जागेचं दुखणं आहे.

अशा वेळी ‘अक्षरगंध’ अंकाचं संपादकीय लक्षवेधी ठरतं. संपादक म्हणतात, “प्रकाशक, संपादक म्हणून स्वखर्चाने अंक प्रकाशित करीत आहोत आणि जाहिरातीचं अर्थसहाय्य न घेण्याचा विचार पंधरा वर्षं प्रत्यक्षात आणत आहोत. याचा अर्थ एकच जाहिराती मिळवण्यासाठी स्वतंत्र वेळ देणं शक्य नसतं, पण त्यामुळे स्वतंत्रपणे काम करता येतं. दरवर्षी जवळ जवळ 40 टक्के तोटा होतो. अंकाचं समाधानकारक काम करताना मिळणारा जो आनंद आहे, तो त्यापुढे लुप्त होतो.’’ अर्थात हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. त्यात एखादाच निघतो.

शेवटी एकदाचा अंक प्रकाशित होतो. वितरक त्याचं वितरण करतात. वाचक मग ते व्यक्तिगत किंवा लायब्ररीवाले हे अंक घेतात, पण हा सगळा खेळ जेमतेम दिवाळी संपेपर्यंत पंधराएक दिवसांचा. या धंद्याचं हे विचित्र गणित हे असं आहे.
तरीही या माहोलमध्ये फेरफटका मारण्याचं सुख ज्याने अनुभवलं आहे त्यालाच कळू शकेल. दिवाळीपर्यंत हे अंक विकणाऱया आणि घेणाऱयांमध्ये उत्साह दिसतो. एखादा फारच रेंगाळताना दिसला तर “कोणता अंक हवाय तुम्हाला?’’ असं विक्रेता म्हणतोही. चार दिवसांनी हा वाचक कशाला इकडे फिरकणार आहे हे पण त्या विक्रेत्याला माहीत असते. तर अशा पाहणाऱयातला एका अनुभव सांगतो. पुण्यात अप्पा बळवंत चौकात दिवाळी अंक असलेल्या मंडपात माझ्यासारखेच दहा-पाच जण अंक चाळत होते. त्यातलाच एक जण मौजेचा अंक उघडून तन्मयतेने बघत होता. काय बघत असतील? कुतूहलाने मी पण त्यात डोकावले. ती गोष्ट होती ‘बाळ गणपती’ची. त्याला चित्र होतं बहुधा बाळ ठाकूर यांचं. लेखक म्हणून नाव होतं दि. बा. मोकाशी यांचं. मोकाशी हे मोजकंच लिहिणारे कथा लेखक. त्यामुळे मी पण कुतूहलाने ते पाहू लागलो. माझी चाहूल लागल्याने ते अंक चाळणारे माझ्याकडे बघू लागले. आमची नजरा नजर झाली. अहो आश्चर्यम, ते कथा लेखक दि. बा.मोकाशीच होते! मी म्हटलं, “तुमचीच कथा बघताय?’’
तेव्हा ते मुग्ध हसत म्हणाले, “हो.’’
तेव्हा मी म्हटलं, “तुमचीच कथा?’’
माझ्या बोलण्यातलं आश्चर्य त्यांना जाणवलं असणार.

ते म्हणाले, “तुझा प्रश्न बरोबर आहे. माझीच कथा असणारा ‘मौज’चा अंक टपालाने माझ्याकडे येईलच, पण माझी कथा कशी छापली आहे, त्याला चित्र कुणाचं आहे याचं मला कुतूहल होतं. ती उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून मी इथे मंडपात येऊन माझी कथा पाहतो. हे ताजं ताजं दिसणं मोठं सुखावह असतं. कारण तेव्हा ती माझी कथाच राहात नाही. एक स्वतंत्र दर्शन म्हणून त्याकडे मी पाहत असतो.’’ आज या गोष्टीला कितीतरी वर्षे झाली, पण एखाद्या गोष्टीकडे त्रयस्थपणे कसं पाहता यायला हवं याचाच त्यांनी अप्रत्यक्षपणे धडा दिला.

दिवाळीचं उत्सवी वारं ओसरल्यानंतर दिवाळी अंकाची दुकानं, मंडप सगळंच ओकंबोकं दिसायला लागतं. तरीपण अशा मोकळ्या जागेत दोन-चार जण चुकल्या फकिरासारखे अंक पाहताना दिसतात. ही अंक चाळणारी मंडळी कोण असतात? तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून दिवाळी अंक प्रकाशित होतात. पण संपादकाला घाई असते ती विक्रेत्याला अंक पाठवण्याची. त्यानंतर त्या अंकातील लेखकांना तो पाठवला जातो. यात वेळ जातो, पण लेखक अधीर झालेला असतो तो आपला लेख पाहण्यासाठी. आपलं लेखन दिवाळी अंकात आलं आहे की नाही याचीही त्याला उत्सुकता असते. ते कसं छापलं आहे हेही त्याला पाहायचं असतं.

थोडक्यात दिवाळी संपल्यानंतरही दिवाळी अंकाच्या मंडपात रेंगाळणाऱ्यांमध्ये एखादा दुसरा लेखकच असतो!