आनंद, हर्षोल्हासाचा सण दिवाळी उद्या बसुवारसपासून सुरू होतोय. दिवाळी म्हटली की खरेदी आली. खरेदी म्हणजे उत्साहाचे दुसरे नाव. याच उत्साहाने रविवारचा मुहूर्त साधत हजारो मुंबईकर खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे मार्केटमध्ये दिवाळी शॉपिंगचा धडाका होता. मॉल्स, दुकाने भरून गेली, स्ट्रीट शॉपिंग जोरदार होती.
दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. आज दिवाळी आधीचा शेवटचा रविवार होता. त्यामुळे कुटुंबकबिल्यासह लोक शॉपिंगला निघाले. दिवाळीनिमित्त पणत्या, कंदील, रांगोळ्या, लायटिंगची तोरणं, गृहसजावटीचे साहित्य यांची महिलांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. याशिवाय, कपडे, शूज, फटाके यांची दुकानेही ओसंडून वाहत होती. खरेदीचा माहोल पाहता सर्वच भागांत दुकाने लवकर उघडली. फेरीवाल्यांनीही दुकाने लवकरच थाटली. फेरीवाल्यांकडून लहानमोठय़ा वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. लोकल ट्रेन, बसमध्ये गर्दी होती. खरेदीसाठी लोक गाडय़ा घेऊन रस्त्यावर उतरले. त्यामुळे वाहतूक काsंडीत भर पडली. क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, काळबादेवी येथील स्वदेशी मार्केट, मुलजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, लोहार चाळ, भुलेश्वर मार्केट, दादर मार्केट, गांधी मार्केट, उपनगरात विलेपार्ले, मालाड, बोरिवली येथेही खरेदीसाठी झुंबड होती.
आजपासून दीपोत्सव
दीपोत्सव सोमवार 28 ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशीच्या दिवशी सुरू होऊन रविवार, 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज सणापर्यंत आहे. मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, तर गुरुवारी 31 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आहे. शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी सायंकाळी 6.04 ते रात्री 8.35 या प्रदोषकालात लक्ष्मी कुबेर पूजन करायचे आहे. शनिवार, 2 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आहे. रविवार, 3 नोव्हेंबर रोजी यमद्वितीया, भाऊबीज आहे.
n क्रॉफर्ड मार्केट, दादर मार्केट, सायन, विलेपार्ले, मालाड, बोरिवली येथील बाजारपेठांमध्ये गर्दी होती. दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या मार्केटमध्ये तर गर्दीचा उच्चांक होता. दादर स्टेशनपासूनचे रस्ते गर्दीने फुलून गेले. गर्दीतून वाट काढत लोक खरेदी करत होते.
n एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात लोक खरेदीसाठी निघाल्याने वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला. जागोजागी वाहतूक काsंडी झाली. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. तरीही लोकांचा शॉपिंग मूड ‘हाय’ होता. रात्रीपर्यंत सर्वत्र हीच स्थिती होती.