लाडक्या बहिणींप्रमाणे मानधन द्या…दिव्यांगांनी घेतला आमदार निवासाचा ताबा

या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय, कोण म्हणते देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय…. अशा घोषणा देत दिव्यांगांनी आज आकाशवाणी आमदार निवासाचा ताबा घेतला. लाडक्या बहिणींप्रमाणे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील दिव्यांगांनी मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढला आणि नंतर थेट आकाशवाणी आमदार भवनाच्या गच्चीचा ताबा घेतला.

दिव्यांग कल्याण मंत्रालय प्रमुख व प्रहार दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयावर आंदोलन करण्यात आले.

मागण्या कोणत्या

दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे. घर देण्यात यावे, दिव्यांगांची कर्जमाफी झालीच पाहिजे. दिव्यांगांना व्यवसायासाठी गाळा आणि जागा मिळालीच पाहिजे.

मागण्यांची अंमलबजावणी नाही

यासंदर्भात बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन-चार बैठका घेतल्या. मागण्यांच्या संदर्भात जे निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही. मानधनापासून अपंग विद्यापीठ, प्रत्येक जिह्यात दिव्यांग भवन अशा आमच्या मागण्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.