>> दिव्या नेरुरकर-सौदागर
पॅनिक अटॅक हे ‘चिंता आजार’ (एंक्झायटी डिसऑर्डर) असणाऱया व्यक्तींमध्ये आढळलेलं सामान्य लक्षण आहे. चिंता आजार होण्याची कारणं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असली तरी यापैकी ‘घर आणि घरातील परिस्थिती’ हे महत्त्वाचं सामाजिक कारण मानलं जातं. कारण व्यक्तीची जडणघडण, तिचा व्यक्तिमत्त्व विकास हे सर्वप्रथम त्याच्या घरातूनच होत असतं.
शेखर (नाव बदलले आहे) हा तिशीतील तरुण मुलगा होता. एका नामवंत कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून रुजू झालेला होता. आज जवळपास शेखरला त्या कंपनीमध्ये लागून दीड वर्ष झालं होतं. प्रमोशनचीही त्याला संधी मिळाली होती, पण त्याच्या पुन्हा त्याच ‘दुखण्याने’ ती निसटून गेली. शेखर त्यामुळे पुन्हा वैतागला. “काय यार, हा दुसरा चान्स माझ्या माती खाण्याने मी घालवला’’, असं चरफडत तो ऑफिसबाहेर पडला. तडक घरी येऊन कुणाशीही न बोलता बेडरूममध्ये जाऊन अंधार करून बसून राहिला.
शेखरच्या आईच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. थोडय़ा वेळाने कॉफी घेऊन ती शेखरच्या खोलीत गेली. “शेखर…’’ असा तिने आवाज देताच त्याने तिच्याकडे असहाय्य नजरेनं पाहिलं, “आई, मला आज पुन्हा पॅनिक अटॅक आला. ऑफिसमध्ये आज एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. मी लीड करणार होतो, पण तेच सुरू होण्यापूर्वी मला छातीत जोरजोरात धडधडायला लागलं, भरपूर घाम आला, कान बंद झाले. इतका त्रास झाला मला. शेवटी मी मीटिंगला बसलोच नाही. ही मीटिंग आणि प्रेझेंटेशन माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. माझं प्रमोशनही या मीटिंगवर अवलंबून होतं. मी केवढी तयारी केलेली, पण शेवटी मी बॅकऑफ केल्याने माझ्या दुसऱ्या कलिगला ती संधी मिळाली.’’ हे एका दमात सांगताना शेखरच्या डोळ्यांतून अश्रू आले.
शेखरचा हा मानसिक त्रास गेली दोन वर्षे त्याला मनस्ताप देणारा ठरला होता. त्यावर त्याचे औषधोपचारही सुरू होते, पण औषधांबरोबरच समुपदेशन घेण्याचं अजून काही त्याला जमत नव्हतं. “शेखर, तू आता समुपदेशन घ्यायला सुरू कर. त्याने तुला बराच फरक पडेल.’’ डॉक्टरांनी (मानसोपचार तज्ञ) त्याला समजावलं. “पण डॉक्टर, मी तर औषधं घेतो आहे. मग पुन्हा थेरपी का?’’ शेखरने त्याची शंका उपस्थित केली. डॉक्टर हसले आणि म्हणाले, “मानसिक आजार मनाला खोल जखम करून जातात तेव्हा औषधं ही गरजेची होऊन जातात, पण जेव्हा ती जखम भरायला येते तेव्हा तो पुन्हा बळावू नये किंवा आटोक्यात ठेवण्यासाठी काय करता येईल हे समुपदेशनाद्वारे आपल्याला लक्षात येतं. समुपदेशनामुळे तुला तुझ्या पॅनिक अटॅकना नियंत्रणात आणणे सोपे जाईल. तसंच काही थेरपीज तुला तुझ्या नकारात्मक आणि भीतिदायक विचारांवर मात करायला मदत करतील.’’
शेखरने समुपदेशनासाठी लगेच फोन केला आणि ठरल्या वेळेनुसार तो समुपदेशनासाठी आला. सत्राला आला असतानाच त्याने त्याच्या समस्येबद्दल सांगायला सुरुवात केली…“मॅडम, हा प्रॉब्लेम मला माझ्या एमबीएला असताना जास्त जाणवायला लागला होता, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मला आठवतंय… मी काही ना काही कारण काढून ग्रुप्सना टाळायचो किंवा ग्रुप प्रेझेंटेशनच्या वेळेस पाठी राहायचो. मला वर्गात उभं राहून सगळ्यांसमोर बोलायला जमायचं नाही, पण हुशारीमुळे पुढे आलो. दोन वर्षांपूर्वी समस्या वाढली. ऑफिसमध्ये माझ्या हाताखाली माझी टीम आहे, पण जेव्हा त्यांना गाईड करायचं असतं तेव्हा मी त्या सगळ्यांशी एकत्र मिळून बोलू शकत नाही. घरीसुद्धा काही फंक्शन असेल तर मी जास्त नातेवाईकांमध्ये बावरतो. का मला हा त्रास होतोय आणि मी यावर कशी मात करू?’’
त्याच्या पॅनिक होण्याच्या मुळाशी जाणं गरजेचं होतं. कारण बहुतेकदा असं बघण्यात आलं आहे की, पॅनिक अटॅक हे ‘चिंता आजार’ ( एंक्झायटी डिसऑर्डर) असणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळलेलं सामान्य लक्षण आहे. आता चिंता आजार होण्याची कारणं जरी बरीच (शारीरिक, मानसिक आणि सामाजिक) असली तरी ‘घर आणि घरातील परिस्थिती’ हे महत्त्वाचं सामाजिक कारण मानलं जातं. कारण व्यक्तीची जडणघडण, तिचा व्यक्तिमत्त्व विकास हे सर्वप्रथम त्याच्या घरातूनच होत असतं.
असंच काहीसं शेखरच्या बाबतीतही लक्षात आलं. त्याचं आणि त्याच्या वडिलांचं उभ्या आयुष्यात पटलं नव्हतं. कारण मुळातच तापट आणि काहीसे संशयी असलेले त्याचे वडील त्याचा कायम पाणउतारा करत आलेले होते. त्यामुळे शेखरमध्ये लहानापासून आत्मविश्वासाचा अभाव होता. त्याच्या आईलाही त्यांच्या तापट स्वभावाचा भरपूर त्रास होता. रोजच्या कटकटी आणि भांडणांमुळे त्याच्या घरात पोषक वातावरण तयार झाले नाही. साहजिक याचा परिणाम शेखरवर झाला. तो घरात स्वतला असुरक्षित समजू लागला होता. रात्री त्याला मधेमधे भयानक स्वप्नेही पडत. हेच भय आणि असुरक्षितता त्याच्या मानसिक समस्येमध्ये कधी बदलली हे त्याला समजलेच नाही. ‘आपण भित्रे आहोत’, ‘आपण आपली सुरक्षा करू शकत नाही’ अशा प्रकारचे गंडात्मक विचार त्याच्या मनात रात्रंदिवस थैमान घालू लागले आणि त्याचीच परिणती त्याच्या ‘पॅनिक अटॅक’मध्ये झाली. हे अटॅक त्याला भरपूर लोक; विशेषत अनोळखी माणसांच्या घोळक्यात जाणवू लागले. “मला अक्षरश लॉस्ट फीलिंग येतं हे अटॅक आल्यावर. काही सुचत तर नाहीच आणि मी मरेन की काय असं वाटायला लागतं. वाटतं सगळं संपवावं.’’ शेखर आवंढा गिळत म्हणाला.
त्याची स्वतच्या समस्येबद्दलची जागरूकता आणि ती सोडवण्यासाठीची मानसिक तयारी बघता समुपदेशन प्रक्रिया सोपी झाली. शेखरला सर्वात आधी त्याच्या विचारांचा पाया शोधण्यास सांगितले गेले. त्याच्या लक्षात आले की, त्याच्या विचारांचा एक विशिष्ट ‘पॅटर्न’ (मला जमणारच नाही) लहानपणासून तयार झाला होता आणि तोही त्याच्या वडिलांच्या विषारी टीकेमुळे. यातून बाहेर पाडण्यासाठी त्याला काही उपाय पडताळून बघण्यास सांगण्यात आले. जसे की; साधारण पाच लोकांच्या समूहात कुठलाही विषय घेऊन गप्पा मारायला सुरू करणे, बोलण्याआधी पूर्वतयारी न करता बिनधास्त बोलणे. हे करत असताना स्वतला जर भीतीयुक्त अथवा नकारात्मक विचार/भावना आल्या तर त्याची नोंद करणे (याला एक्सपोजर थेरपी म्हटले जाते). त्याच्या जोडीलाच शेखरला मेडिटेशन आणि मन आनंदी राहण्यासाठी संगीताचा पर्यायही सुचवण्यात आला. त्याला वाचन सुरू करायचे होते. तेही त्याने संगीताच्या जोडीला सुरू केले.
(वरील समुपदेशनात सुचवले गेलेले उपाय / थेरपीज या व्यक्तिसापेक्ष असतात. म्हणजेच सत्रांमध्ये आलेल्या व्यक्तींशी बोलून, त्यांचा कल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करूनच हे उपाय सुचवले जातात. त्यामुळे सरसकट वाचून हे उपाय करू नयेत ही विनंती.)
शेखरला या सगळ्याचा फायदा होत होता. तो त्याच्या विचारांवर आणि भयप्रद भावनांवर काम करत होता. हळूहळू त्याला अशीही जाणीव झाली की, त्याला भीतीपेक्षा अधिक असा वडिलांवर राग होता, जो आतापर्यंत सुप्तावस्थेत होता. त्यासाठीही त्याचे समुपदेशन सुरू झाले, जेणेकरून राग कमी होईल.
आज शेखरच्या पॅनिक अटॅकचे प्रमाण नगण्य आहे. तो आता जास्तीत जास्त स्वतला गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो, ज्यामुळे नकारात्मक; विशेषत भीतीप्रद भावना तयार होणार नाहीत. त्याने वडिलांना माफ केलेले नाही, पण नकारात्मक टीकेकडे दुर्लक्ष करायला शिकतोय.
[email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)