
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘टॉक्सिक’ स्वभावाच्या व्यक्ती या अतिशय नकारात्मक, स्वकेंद्री, कमालीच्या रागीट आणि धूर्त असतात. त्यांच्या कामाच्या वेळी अतिशय मृदू असणाऱया या व्यक्ती काम झालं की पुन्हा मूळ पदावर येतात. या स्वभावामुळे या व्यक्ती कोणाशीही सख्य बनवू शकत नाहीत. कुठलंही नातं टिकवू शकत नाहीत. ज्याचा परिणाम होत जवळच्या व्यक्तींचे मानसिक खच्चीकरण होते आणि कौटुंबिक वातावरण निरोगी राहत नाही.
‘‘माझी आई अक्षरश तोंडातून विष ओकते. ऐकवत नाही मला आणि आता सहनही होत नाही. मी आता खरंच मरून जाणार आहे’’ बोलता बोलता बारा वर्षांचा अक्षय (नाव बदलले आहे) रडत होता. त्याला घेऊन त्याचे वडील आणि त्याची आजी समुपदेशनाला आले होते. याआधी अक्षयला घेऊन त्याचे आईवडील एक महिन्यापूर्वी समुपदेशनाला आले होते. “हा आमचं ऐकत नाही. अभ्यास करणं त्याने बंद केलंय. फक्त मोबाइल हवा असतो’’ अशा त्याच्या बद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचताना अक्षय मात्र आईकडे जळजळीत कटाक्ष टाकत होता आणि बाबांकडे पाहून मान हलवत शांत बसून होता. “बघितलंत मॅडम! कसा निर्लज्जासारखा शांत आहे तो. कसलीही लाज नाहीये याला.’’ त्याच्या आईचा राग बाहेर पडायला सुरुवात झाली होती.
“हो हो! थांब आता!’’ अक्षयचे वडील तिला मध्येच थांबवत म्हणाले. कारण ती बोलत असताना अक्षयच्या बदलत जाणाऱया हावभावांकडे त्यांचे बारीक लक्ष होते. “मॅडम, तुम्हीच बोलून घेता का अक्षयशी? आम्ही बाहेर जाऊन बसतो’’ असे म्हणत ते उठलेसुद्धा. दोघेही बाहेर गेले तरी अक्षय गप्पच होता. “मला नाही काही सांगायचंय’’ खाली मान घालत तोच म्हणाला. “का रे?’’ असं विचारल्यावर “उपयोग नाहीये काही. कारण तुम्हीसुद्धा मी वाया गेलोय असं समजून लेक्चर देणार.’’ हे सांगताना उद्विग्नता त्याच्या तोंडातून पटकन बाहेर आली. “कदाचित मी तुला लेक्चर न देता आईला लेक्चर दिलं तर!’’ असे सांगितल्यावर त्याने पटकन वर पाहिले. शेवटी त्याच्या आईवडिलांना सांगून त्या वेळी सत्र संपले. त्यानंतर थोडय़ा थोडय़ा दिवसांनी जेव्हा केव्हा अक्षय येई तेव्हा तो शांतच बसून असे. त्याची आई मात्र त्याच्या नवनव्या तक्रारींचा पाढा वाचतच असे.
अक्षयही सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. मात्र त्याच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येत होती की, त्याचे आणि आईचे नाते हे निरोगी नव्हते. दोघांमध्ये कायमच धुसफूस, एकमेकांबद्दलची अढी आणि गैरसमज भरपूर जाणवत होते आणि याचा प्रत्यय लवकरच आला, जेव्हा अक्षयने स्वतहून सत्राला येण्याची तयारी दर्शवली. त्या वेळी तो वडिलांबरोबर त्याच्या आजीलाही घेऊन आला. “अक्षय जेव्हा केव्हा त्याच्या आईशी म्हणजे माझ्या मुलीशी भांडतो तेव्हा तीन-चार दिवस आमच्याकडे येऊन राहतो आणि आता तर 15 दिवस झाले तरी तो घरी जायलाच तयार होत नाहीये. काल अचानक त्याने जावयांना फोन केला आणि इकडे येण्यासाठी तुमची अपॉइंटमेंट घेतली.’’ त्याची आजी सांगत होती. तेव्हा अक्षयचे वडीलही पटकन म्हणाले, “बोल बाळा, आता सांग काय होतंय ते? तुझ्या आईला आम्ही इथे येण्याबद्दल नाही सांगितलंय.’’ असे त्यांनी म्हणताच अक्षयच्या डोळ्यांत टचकन पाणी आले आणि तो भडाभडा बोलायला लागला. “माझी आई अक्षरश तोंडातून विष ओकते. मला आता मरायचं आहे. मला माहीत आहे की, माझ्यामुळे ती आयुष्यातून उठली आहे.’’ हे तो बोलला तेव्हा त्याचे वडील आणि आजी सर्दच झाले.
“अरे, काय बोलतो आहेस तू अक्षय? कोण बोललं तुला?’’ वडिलांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. “आई’’ अक्षय निराशेने म्हणाला आणि नंतर त्याने पुढील हकिगत सांगितली ती अशी.
अक्षयच्या आईला लग्नानंतर लगेच मुलाची जबाबदारी घ्यायची नव्हती; पण तिला वर्षभरातच अक्षय झाला. मूळची स्वभावाने कठोर, काहीशी गंभीर (विक्षिप्त म्हटले तरीही चालेल) असलेली ती त्याच्या जन्मानंतर अजूनच कठोर झाली आणि अक्षयच्या वडिलांना दोषी ठरवून मोकळी झाली. त्यामुळे तिने तिच्या आईलाही सासरी बोलावून घेतले आणि लहानग्या अक्षयची जबाबदारी तिच्यावर टाकली. नंतर नंतर तिने अक्षयवर राग काढायला सुरुवात केली. हे सगळे करत असताना ती अक्षयच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतेय हे तिच्या खिजगिणतीतही नव्हते. जहरी बोलणे, टीका करणे, कायम दुसऱयाला दोष देणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, घरी कायम इतरांना दहशतीखाली ठेवणे हे अक्षयच्या आईच्या स्वभावातच भिनले होते.
“आमच्या घरी कुठल्याही सणाला किंवा मंगल प्रसंगाला सुतकी वातावरण असतं. कारण माझी बायको काहीतरी मागचं उकरून काढते आणि भांडण सुरू होतं’’ अक्षयचे वडील सांगत होते. “टॉक्सिक आहे आई!’’ अक्षय पुन्हा कळवळून म्हणाला.
‘टॉक्सिक’ किंवा साध्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘विषारीपणा’ हा त्याच्या आईचा स्वभाव पहिल्यापासूनच होता आणि अक्षयच्या जन्मानंतर तो वाढलेला होता. टॉक्सिक गुणधर्माच्या व्यक्ती या अतिशय नकारात्मक, स्वकेंद्री, कमालीच्या रागीट आणि धूर्त असतात. त्यांच्या कामाच्या वेळी त्या अतिशय मृदू होतात आणि काम झाले की पुन्हा मूळ पदावर येतात. अक्षयची आई या गुणधर्मामध्ये बसत होती. तिच्या अशा स्वभावामुळे ती कोणाशीही सख्य बनवू शकत नव्हतीच आणि कुठलेही नाते टिकवू शकत नव्हती. कोणीही तिला माया दाखवली किंवा सलगी दाखवली की ती पटकन सावध व्हायची आणि समोरच्या व्यक्तीला लागेल असे बोलून तिला तोडून टाकायची.
अक्षयच्या आजीनेही याला दुजोरा दिला आणि तिचा हा स्वभाव लहानपणापासून असल्याचे तिने सांगितले, पण त्यामुळे अक्षयवर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले होते, जे एव्हाना झालेल्या सत्रांमध्ये दिसून आले होते. त्याच्या वडिलांनी हे खेदपूर्वक नमूद केले की, त्याची आई तिच्या स्वतच्या चुका मान्य करणार नव्हती आणि दुर्दैवाने तसेच झाले. तिने स्वतचा दृष्टिकोन बदलायला नकार दिला. कारण तिच्या मते ती अशी वागत होती त्याला कारणीभूत तिचे अति शिस्तीत गेलेले बालपण होते. तिचे वडीलही तिच्याशी तसेच वागत आलेले होते आणि त्यामुळे ती ‘टफ’ बनली होती. मात्र जेव्हा अक्षय जास्तच घुमा झाला तेव्हा ती सत्राला आली.
“अक्षय आणि तुम्ही वेगळे नाही का?’’ या प्रश्नावर ती थोडी दचकली. “असू दे ना! पण याचा अर्थ हा होत नाही की, त्याने मुळूमुळू राहावं’’ अशी सारवासारव तिने केली. “बरोबर! पण अक्षयला सुधारताना तुम्ही त्याच पद्धतींचा उपयोग करत नाही का, जो तुमच्या लहानपणी केला गेलेला आणि तुम्हाला तो आवडला नव्हता?’’ असे म्हटल्याबरोबर ती शांत झाली. “मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतं?’’ तिने काहीशा अधीरतेने विचारले. “तुमची बोलण्याची पद्धत बदलावी असं मला वाटतं.’’ असे सुचवल्यावर “बघते’’ असे म्हणत अक्षयच्या आईने निरोप घेतला खरा, पण तिच्यातील विषारी वाग्बाण कधी जातील याची काही शाश्वती नव्हती. तत्पूर्वी अक्षयबरोबर सत्रे सुरू ठेवली जात होती, ज्यामध्ये त्याच्या रागावर आणि ताणावर काम करण्यात येत होते. जे त्याच्यासाठी आवश्यक होते. त्याचबरोबर जोडीला त्याच्या वडिलांना सामील करून घेतले गेले. कारण शेवटी ते त्याच्यासाठी आधारस्तंभ होणार होते.
[email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)