>> दिव्या नेरुरकर-सौदागर
शारीरिक चिंता आणि अतिविचार या चक्रात आपण फसलो की त्याचे दैनंदिन जीवनावर परिणाम व्हायला सुरुवात होतात. हे अनाठायी विचार कमी करत भेडसावणाऱया चिंतेचे समुपदेशनाद्वारे व्यवस्थापन केले गेले तर नकारात्मकता आपोआप दूर सरते.
रिद्धी (नाव बदलले आहे) दहावीला होती. अभ्यासात प्रचंड हुशार, महत्त्वाकांक्षी आणि मेहनती होती. तिच्या पालकांना तिच्या या गुणांचं विशेष कौतुक वाटायचं. तिच्या पालकांबाबत सांगायचं झालं तर; तिचे आईवडील दोघंही उच्चशिक्षित आणि खासगी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करत होते. साधं आणि सरळ असं हे कुटुंब होतं. आईवडील ऑफिसला गेल्यावर रिद्धी स्वतचं आटपून शाळेत जायची. तिथून मग क्लास आणि घरी यायची. तेव्हा आई घरी आलेली असायची. थोडय़ा वेळात बाबाही ऑफिसमधून यायचे. मग तिघांचा मस्त गप्पांचा फड रंगायचा. असे दिवस चालले होते.
त्या दिवशी नेहमीसारखी रिद्धीची आई ऑफिसमधून घरी यायला निघाली. तेवढय़ात तिच्या मोबाइलवर रिद्धीचा कॉल आला. जेव्हा तिने उचलला तेव्हा रिद्धीचा आवाज तिला वेगळाच भासला. ‘काय झालं बाळ?’ तिने काळजीच्या स्वरात विचारलं. ‘काही नाही आई. तू लवकर घरी ये. मला खूप भीती वाटत्येय.’ रिद्धी म्हणत होती. ‘मला काहीतरी होतं आहे. खूपच अनईझी. तू प्लीज लवकर ये. कॅब बुक कर.’ तिचा स्वर टिपेला पोहोचला होता.
‘घरी येईपर्यंत काही माझ्या जिवात जीव नव्हता मॅडम. नुसत्या नको त्या शंकांनी मला घेरलं होतं. जेव्हा रिद्धीला सुखरूप पाहिलं तेव्हा हुश्श झालं. डोकं दुखत होतं तिचं. हेसुद्धा सारखा फोन करत होते. शेवटी मी त्यांना म्हटलं टेन्शन नका घेऊ.’ रिद्धीची आई समुपदेशन सत्रात तिला घेऊन आली होती आणि वरील घटना सांगत होती. तेव्हाही तिचा आवाज घोगरा झाला होता. ‘ममा, माझं डोकं वेगळ्या टाइपचं दुखत होतं. म्हणून मी घाबरले ना.’ रिद्धी मधेच बोलती झाली. ‘कशा टाइपचं डोकं दुखत होतं तुझं?’ असं विचारल्यावर ती गंभीर स्वरात म्हणाली, ‘टय़ुमर झाला असेल तर कसं दुखतं तसं.’
रिद्धीने असं सांगताच तिला डॉक्टरांनी (न्यूरॉलॉजिस्ट) समुपदेशनासाठी का पाठवलं होतं याचा उलगडा झाला. कारण तिचे सगळे रिपोर्टस् नॉर्मल आलेले होते. असं असूनही ती शांत झाली नव्हती. तिला कुठेतरी वाटत होतं की तिच्या मेंदूला नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि त्याचं योग्य ते निदान झालं नसावं. तिचं डोकं कधीतरी दुखायचं. शिवाय तो त्रास जेव्हा सुरू व्हायचा तेव्हा तिचे हातपाय पूर्ण बधिर होऊन जात. डोळ्यांसमोर काजवे चमकू लागत आणि तिला घाम फुटे. तसंच हृदयाचे ठोकेही वाढू लागत. रिद्धीशी डोक्याच्या समस्येबाबत बोलणं गरजेचं होतं, कारण तिने तिच्या दुखण्याचा संबंध थेट ‘ट्युमर‘शी लावलेला होता.
‘तुला ट्युमर का वाटतो?’ असं रिद्धीला विचारलं तेव्हा तिने पटकन उत्तर दिलं, ‘मी एक वेबसीरिज पहिली होती ज्यामध्ये माझ्याच वयाची एक मुलगी होती जिला ब्रेन टय़ुमर झालेला असतो. त्याच्या इनिशिअल स्टेजला तिला असाच त्रास होत होता. त्या वेळेला कोणालाच डायग्नोज करता आलं नाही. जेव्हा कळलं तेव्हा ती लास्ट स्टेज ऑफ टय़ुमर होती. अँड शी डाइड मॅम.’ हे सांगताना रिद्धीच्या डोळ्यांत पाणी आलं. तेव्हाही तिचं डोकं दुखायला सुरुवात झाली आणि ती अस्वस्थ झाली.
रिद्धी ‘सोमॅटिक एन्झायटी’ म्हणजेच ‘शारीरिक चिंता’ या समस्येने ग्रासली होती. ज्याचं मूळ आणि कारण तिच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं ते असं… रिद्धी अतिशय संवेदनशील आणि विचारी मुलगी होती. कुठल्याही बघितलेल्या किंवा ऐकलेल्या घटनांचा ती सखोल विचार करत असे. शिवाय काही घटना तिच्या मनामध्ये खोल रुतून जात. तिचा स्वभावही इतरांना; विशेषत गरजूंना मदत करण्याचा होता. त्यांच्या दुःखामध्ये, वेदनांमध्ये ती नकळतपणे गुंतून जाई आणि त्यांचाच परिणाम व्हायला सुरुवात झाली.
शारीरिक चिंता आणि अतिविचार या दुष्टचक्रात रिद्धी इतकी फसली होती की तिच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम व्हायला लागला होता. तिच्या खाण्यावर तसंच झोपेवर परिणाम दिसायला लागला होता. अभ्यासावर तर झालेलाच होता. अभ्यास करताना तिला डोकेदुखीचा त्रास जास्त जाणवत असे. कधीकधी तर तिचं डोकं जरा जरी दुखायला लागलं तरी ती घाबरून (पॅनिक होऊन) जात असे. ‘मला काही झालं नाही ना मॅडम? मला इतक्यात मरायचं नाहीये आणि आईबाबांना सोडून तर मी राहूच शकत नाही.’ हे बोलताना तिचे डोळे पाणावले होते.
रिद्धीच्या समस्येला वर म्हटल्याप्रमाणे कंगोरे खूप होते. आईबाबा, घर आणि शाळा एवढय़ापुरतं तिचं जग मर्यादित राहिलेलं होतं. तिला सोबत होती ती ‘आभासी जगाची’ आणि ती वयात येणं हाही महत्त्वाचा घटक तिच्या समस्येला खतपाणी घालत होता. मुळातच असणारा संवेदनशील आणि भिडस्त स्वभाव, अतिविचार आणि पालकांकडून केली गेलेली अति जपणूक. कुटुंबाशी बोलताना असं लक्षात आलं की रिद्धीची, तिच्या तब्येतीची जास्तच काळजी त्यांच्याकडून घेतली गेलेली होती. दुसरी बाब म्हणजे तिचे वडील तिच्याबद्दल भावुक असत. या सगळ्याचा वेगळा (काहीसा चिंतायुक्त) परिणाम रिद्धीच्या मनावर तिच्याही नकळत झालेला होता आणि त्याची परिणती त्या वेबसीरिजने झाली. तो ‘ट्रिगर पॉइंट’ होता.
रिद्धीबाबत उपचार करताना मानसोपचार तज्ञांचीही मदत घेतली गेली, कारण ‘शारीरिक चिंता’ आणि ‘नकारात्मक विचार’ तिच्यावर परिणाम करत होते. त्याच्या जोडीला तिचे समुपदेशनही सुरू झाले. त्यामध्ये तिच्या वडिलांनाही सामील करून घेतले गेले. त्यांच्या मनातील ‘मुलीच्या स्वास्थ्याबाबत असलेली अनाठायी चिंता आणि काळजी’ यावर सत्रे घेतली गेली. त्यामध्ये त्यांना अनाठायी विचार कसे कमी करायचे आणि त्यायोगे चिंतेचे व्यवस्थापन कसे करायचे हे सांगितलं गेलं.
दुसरीकडे रिद्धीलाही तिला स्वतला जास्तीत जास्त व्यग्र ठेवता येईल अशाप्रकारे तिचे दिवस आखले गेले. ज्यायोगे तिचे मन तिच्यासाठी उपयुक्त गोष्टींमध्ये वळवण्यात आले. याचा फायदा असा झाला की तिची डोकेदुखी बऱयाच अंशी आटोक्यात आलीच. शिवाय रिद्धीचं घाबरणंही कमी झालं. ती आता मित्रमैत्रिणींमध्येही रमायला लागली होती. कारण तसं तिला सांगण्यात आलेलं होतंच. तिच्या चिंता, नकारात्मक विचार ती प्रामाणिकपणे तिच्या ‘डायरी’मध्ये लिहून काढत होती आणि सत्रांमध्ये त्यावर चर्चा करून उपाय विचारत होती.
रिद्धी आणि तिचे वडील आता त्यांच्या समस्येतून बाहेर पडत होते. तिने गंभीर विषयावरचे साहित्य, त्यावरील चर्चा आता टाळल्या होत्या. त्याऐवजी ती तिघे ‘स्टॅन्डअप कॉमेडी शोज’ना जाऊ लागले होते.