
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी शहरातील बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई सुरू असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा विभागातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले. मात्र उर्वरित 52 इमारतीतील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
याविरोधात बेकायदा इमारतीमधील रहिवाशांनी आज प्रतिकात्मक ‘गळफास आंदोलन’ करून ठिकठिकाणी फाशीचे दोर लटकवून प्रशासनाचा निषेध केला. आमच्या घामाची, रक्ताची कमाई ही घरे घेण्यासाठी खर्ची केली आहेत. आम्हाला न्यायालयात दाद मागण्यासाठी पुरेसा वेळ द्या, अन्यथा आम्ही आयुष्य संपवू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
आम्हाला बेघर केले तर आमचे संसार रस्त्यावर येतील. आमच्यासमोर मरणाशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही. असा टाहो संतप्त रहिवासी निकिता नारायणे यांनी फोडला. एकीकडे पंतप्रधान मोदी आवास योजनेच्या नावाखाली गोरगरीबांना घरे देत असल्याच्या जाहिराती करीत आहे आणि दुसरीकडे आमची असलेली घरे उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. एकीकडे लाडक्या बहिणी आहात असे सांगून आमच्याकडून मते घेतली. मग आता सरकार आहे कुठे? आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? असा संताप दिबा सिंग यांनी व्यक्त केला.
रहिवाशांना जबरदस्तीने इमारतीबाहेर काढले तर त्यांचे संसार रस्त्यावर येतील. माननीय न्यायालयासह महापालिका प्रशासनानेही याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्या बिल्डरांनी खोटी कागदपत्रे बनवून या अनधिकृत इमारती बांधल्या त्यांच्यावर कारवाई करायची सोडून प्रशासन गोरगरीब रहिवाशांना बेघर करण्याच्या मागे लागले आहेत. आज रहिवाशांनी प्रतिकात्मक गळफास आंदोलन केले, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही पर्याय राहणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी बिल्डरांवर कारवाई करून या इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन करावे. – रोहिदास मुंडे, दिवा शहर संघटक (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
• उच्च न्यायालयाने दिवा विभागातील बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
• या बैठकीत प्रभाग समितीच्या बीट डायरीत किती अनधिकृत बांधकामांची नोंद आहे याची माहिती घेतली असता ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात सर्व प्रभाग समित्यांमध्ये 769 अनधिकृत बांधकामे आहेत.
● फक्त 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केल्याचे आढळून आले.
सर्व बांधकामे पक्की, अर्धी पक्की, कच्ची, कोणत्याही स्वरूपातील असली तरी ती तत्काळ तोंडून टाकावी असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
दिव्यातील 52 इमारतीतील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा तातडीने बजावण्यात आल्या आहेत. पोलीस संरक्षण मिळताच या इमारती रिकाम्या करून त्या पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे.