कचरा टाकण्यासाठी गेलेल्या वृद्धाला घंटागाडीच्या चालकाने चिरडले असल्याची धक्कादायक घटना दिव्यातील संतोषनगर येथे आज सकाळी घडली. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या सीताराम थोटम (79) यांना तत्काळ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दिवा पूर्व येथील टाटा पॉवर लाइनच्या बाजूला असलेल्या संतोषनगर येथे राहत असलेले सीताराम थोटम शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी ठाणे महापालिकेच्या घंटागाडीचा चालक मनोज कदम आणि सफाई कर्मचारी प्रमोद भोईर यांनी वाहन रिव्हर्स गिअरमध्ये टाकले. त्यावेळी मागे कचरा टाकत असलेल्या सीताराम थोटम यांना त्यांनी धडक दिली. त्यानंतर घंटागाडीखाली अडकलेल्या थोटम यांना त्या गाडीने जवळपास 30 फूट फरफटत नेले.
काही लोकांनी आरडाओरडा करून गाडी थांबवली. गाडीखाली अडकलेल्या थोटम यांना बाहेर काढून तत्काळ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. दरम्यान, याप्रकरणी घंटागाडी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पालिका प्रशासनाने सिताराम थोटम यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.