
कल्याण-डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता दिव्यातही याच प्रश्नावर आगडोंब उसळला आहे. येथील 54 बेकायदा इमारती तोडण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला आज स्थानिक संतप्त नागरिकांनी रोखले. आम्हाला बेघर केले तर याद राखा… पेट्रोल ओतून आत्महत्या करू, असा इशारा देत हजारो दिवावासीय हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर उतरले. ऐन परीक्षेच्या काळात महापालिका दिव्यातील हजारो नागरिकांना बेघर करीत असल्याने त्यांच्या संतापाचा ‘दिवा’ पेटला. पालिकेच्या विरोधात महिला तसेच रहिवाशांनी जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात आलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला अखेर माघारी परतावे लागले. कोणत्याही परिस्थितीत आमची घरे सोडणार नाही, असा इशारा दिव्यातील नागरिकांनी महापालिकेला दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच ठाणे शहरातील सर्व 769 बेकायदा बांधकामांवर तत्काळ बुलडोझर चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन पोलीस बंदोबस्तात बांधकामे तोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा पोलीस फौजफाटय़ासह पथक दिव्यात दाखल झाले. पोकलेन मशीन, जेसीबी ही सामग्री बघून दिव्यातील रहिवासी प्रचंड संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यात संतप्त महिलाही सहभागी झाल्या होत्या. दिव्यातील मुख्य रस्त्यावर या महिलांनी बसकण मारीत आपला संताप व्यक्त केला.
गुरुवारपर्यंत कोर्टाला अहवाल द्यायचाय; कारवाई सुरूच राहणार
कोर्टाच्या आदेशानुसार आज ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी दाखल झाले, पण नागरिकांच्या प्रचंड रोषामुळे पथकाला हात हलवत परत जावे लागले. मात्र उद्यादेखील ही कारवाई आम्ही करणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने नागरिकांची याचिका फेटाळली असून कारवाई करून गुरुवार 27 फेब्रुवारीपर्यंत पालिकेला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही कारवाई आम्हाला उद्याही करावीच लागेल. आयुक्तांच्या या पवित्र्यामुळे दिव्यातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.
कल्याण, डोंबिवलीच्या 65 इमारतींमधील रहिवाशांनाही बेघर करू नका, शिवसेनेची मागणी
‘महारेरा’कडे नोंदणी असूनही कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर महापालिका कारवाई करीत आहे. त्याविरोधात साडेसहा हजार नागरिक रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. त्यांना बेघर करू नका, न्याय द्या, अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. जनता दरबाराच्या निमित्ताने ठाण्यात आलेल्या नाईक यांची दीपेश म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सरकार कुणालाही बेघर करणार नाही, असे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले आहे.
पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करा
केवळ दिव्यातच नव्हे तर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातच मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढली. गेली 18 हून अधिक वर्षे नागरिक तिथे राहत आहेत. तुम्ही आता कारवाई करायला जाता, पण या संपूर्ण प्रक्रियेत दोषी असलेल्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागातील अधिकारी यांच्यावर कारवाई करणार केव्हा, असा खरमरीत सवाल शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे. दरम्यान तत्कालीन दोषी अधिकाऱयांवरदेखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
दिवा ते शीळ वाय जंक्शन या भागातील 54 बेकायदा इमारती तोडण्यासाठी पालिकेचे पथक आले होते. हे पथक अनंत पार्क येथे धडकताच तेथे राहणारी सर्व कुटुंबे घराबाहेर पडली.
आंदोलनातील महिलांच्या हाती पेट्रोलच्या बाटल्या होत्या. आमच्या घराला हात लावला तर स्वतःला पेटवून घेऊ, असा इशारा देताच अधिकारी हादरले.
न्याय दो… न्याय दो…
दिव्यातील विविध चौकांमध्ये सामूहिक आत्मदहन असे फलक लावण्यात आले होते. रहिवासी एवढे संतप्त झाले होते की हजारोंचा जमाव रस्त्यावर उतरला. त्यामुळे ट्रफिक जाम झाले. न्याय दो… न्याय दो… अशा घोषणांनी संपूर्ण दिवा दणाणून गेला. या आंदोलनामध्ये वृद्ध, तरुण, महिला उत्स्फूर्तपणे उतरल्या होत्या.