जिह्याच्या विविध भागातील नदीपात्राचे वाळू माफिया अक्षरशः लचके तोडत असून, वारंवार कारवाई करूनही हे प्रकार सुरूच आहेत. वाळूचा बेकायदा उपसा आणि वाळूची तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. नदी-नाल्यांवर वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाने ड्रोनचा आधार घेतला आहे.
मुळा, मुठा व भीमा नदीमुळे या भागात बिनदिक्कतपणे वाळूउपसा सुरू आहे. रात्री उशिरा दहानंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत जेसीबी, पोकलेन व यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळूचा उपसा केला जातो. ट्रक्टरच्या साहाय्याने वाळू वाहतूक करून एका अड्डय़ांवर साठा करून वाळूची विक्री केली जाते. बेसुमार उपसा केल्याने नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.
जिह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, तसेच आंबेगाव, जुन्नर भागांत या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सुमारे 26 ठिकाणी ठेके देण्यात आले आहेत. त्यानुसार वाळूची विक्री सध्या केली जात आहे; तरीही वाळूचा बेकायदा उपसा सुरू असून, त्याद्वारे वाळूची तस्करी केली जात आहे. त्यासाठी ही चोरी पकडण्यासाठी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ड्रोनचा वापर सुरू केला आहे. दिवसा किंवा रात्री नदीतून बोटीद्वारे वाळूचा उपसा वाळू माफिया करतात. कारवाईपासून वाचण्यासाठी हा साठा तेथेच झाडाझुडपात लपवून ठेवतात.
जिह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागांतील नदी-नाल्यांमध्ये ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार आहे. रात्री होणाऱया हालचालीची माहिती ड्रोनद्वारे मिळणार आहे. प्रत्येक तालुक्यातील नदीपात्रावर स्थानिक अधिकाऱयासह तलाठय़ाच्या मदतीने ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येणार आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करून वाळू साठय़ाचा गोरखधंदा सध्या पह्फावताना दिसत आहे. दररोज अवैधरीत्या वाळूची मोठय़ा प्रमाणावर राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. शासनाचा मोठय़ा प्रमाणावर महसूल बुडवून नुकसान होत आहे. याच अवैध वाहनांच्या सुसाट वेगामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. विनाक्रमांक धावणाऱ्या हायवा ट्रकमधून ही चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे.
मागणीच्या तुलनेत वाळू उपलब्ध होत नाही. परिणामी वाळूचे भाव वाढले आहे त्यासाठी या माफियांनी रात्रीची वेळ निवडली आहे. रात्री उशिराने सुरू होणारा हा प्रवास पहाटेपर्यंत चालतो.
वाळू चोरट्यांवर नजर
पुणे जिह्यातील नद्या, नाले असलेल्या दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव भागांत ड्रोनच्या माध्यमातून वाळू चोरटय़ांवर नजर ठेवली जाणार आहे. वाळू उपशावर लक्ष ठेवून कारवाई केली जाणार आहे. वाळूउपसा रात्री केला जातो. त्यामुळे ड्रोनद्वारे पाहणी करून वाळूचोरीवर लक्ष ठेवले जाईल. वाळूची चोरी रोखणे शक्य होत नाही. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने दोन ड्रोन घेतले असून, त्याद्वारे आता नदी-नाल्यांवर वॉच ठेवला जाणार आहे.