सांगलीतील द्राक्षबागायतदारांची फसवणूक झाल्यास शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत!

जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही अटी व नियमांचे बंधन संबंधित द्राक्ष व्यापारी व दलालांना लागू करावे, यापुढे एकाही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष स्वस्थ बसणार नाही. संबंधित व्यापारी, दलालांवर कारवाईस भाग पाडू, असा इशारा शिवसेनेचे मिरज तालुका संघटक किरण कांबळे यांनी आज दिला.

सध्या द्राक्ष बागायतदारांचा हंगाम सुरू झाला असून, द्राक्ष खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र तसेच देशभरातून अनेक व्यापारी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधत असतात. त्यामध्ये काही दलाल आणि व्यापारी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना थोडे पैसे रोखीने देऊन त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर मोठ्या रकमेचा व्यवहार करून शेतकऱ्यांना फसवले जाते. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी द्राक्षे खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात द्राक्षाची खरेदी आणि विक्री करू नये, असा आदेश काढावा तसेच व्यापारी व दलालांना लगाम घालावा, अशी मागणी आज शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे मिरज तालुका संघटक किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे.