भाजपकडून निवडणुकीत मतांसाठी पैसै, दारूचे वाटप; नाना पटोले यांचा गंभीर आरोप

भाजपने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. आर्वी विधानसभेचे भाजप उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. या वानखेडेंच्या गोदामात दारूच्या बाटल्यांचा साठा सापडला. वर्धा जिह्यात दारूबंदी असतानाही हा दारूसाठा कसा आला? मतदारांना पैसे आणि दारू वाटून भाजपचा मते मिळवण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

भंडारा जिह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, काँग्रेस-महाविकास आघाडीला लोक निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विनोद तावडे खोटारडे

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते? कार्यकर्त्यांना भेटायला गेलो हा तावडेंचा बचाव चुकीचा आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरच्या नेत्यांना थांबता येत नाही, असा नियम आहे, त्यामुळे विनोद तावडे जे सांगत आहेत ते खोटे आहे, असे पटोले म्हणाले.

त्यालाही जिहाद म्हणायचे का?

लोकसभेत व्होट जिहाद झाल्याचा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. एखाद्या जात समूहाने एका पक्षाला मतदान करा असे आवाहन केले तर त्याला भाजप व्होट जिहाद म्हणतो. मतदान कोणाला करायचे हा मतदाराचा हक्क आहे. आता एका समाजाने भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले, त्यालाही ‘जिहाद’ म्हणायचे का? असा प्रश्नही पटोले यांनी केला.