पोलीस बंदोबस्तात राम शिंदेंच्या नातेवाईकाकडून पैशाचे वाटप; रंगेहाथ पकडले, गुन्हा दाखल

मतदान सुरू असताना कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम शिंदे यांचा नातेवाईक संजय खंडेकर (रा. काsंढवा बुद्रूक, पुणे) याला कर्जतमधील लकी हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून 4 लाख 29 हजार रुपये जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे राम शिंदेंचा हा नातेवाईक पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप करत होता.

यासंबंधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक शेठ शिंदे यांनी माहिती दिली. या वेळी अरुण लाळगे, ज्ञानदेव लष्कर, सुमित भैलुमे यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पोलिसांनी सांगितले की, सायंकाळी चार वाजता कर्जत शहरातील लकी हॉटेल या ठिकाणी रूममध्ये संजय खंडाप्पा खांडेकर हा लोकांना पैसे वाटताना सापडला आहे. याच्यावर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनाक्रमाची माहिती दीपक शिंदे, ज्ञानदेव लष्कर यांनी पत्रकारांना दिली. लकी हॉटेलमध्ये भाजप उमेदवार राम शिंदे यांचे नातेवाईक असलेले संजय खांडेकर हे पैसे वाटत असल्याची माहिती मिळाली. आम्ही त्या ठिकाणी गेलो असता हॉटेलचा समोरील दरवाजा बंद करण्यात आला होता. तर पाठीमागील बाजूस असलेला दरवाजा उघडा होता व त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी बसलेला होता. त्या ठिकाणी आतमध्ये शिरत असताना त्या पोलीस कर्मचाऱयाने आम्हाला अडवले व हॉटेलच्या रूमवर जाण्यासाठी प्रतिबंध केला. मात्र आम्ही तशाही परिस्थितीत रूममध्ये गेलो असता खांडेकर हे त्या ठिकाणी पैसे वाटत असल्याचे दिसून आले. पाचशे रुपयांच्या नोटांची काही बंडल त्या ठिकाणी होती. आम्हाला पाहताच त्यांनी ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही तो मुद्देमाल हस्तगत करून तात्काळ पोलिसांना बोलून घेतले. यावेळी सर्व रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. आम्ही येण्यापूर्वीच मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी यादी करून मोठी रक्कम वाटप केली होती. उर्वरित रक्कम पैसे वाटप करत असलेली यादी व इतर कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.

प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष – रोहित पवार

राम शिंदे यांचा नातेवाईक पैसे वाटप असल्याचा व्हिडिओ आणि पह्टोही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी ‘एक्स’द्वारे शेअर केले आहेत. भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या लकी हॉटेलमध्ये पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आम्ही दुपारी दोन वाजता प्रशासनाला दिली. मात्र, प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. तब्बल दोन तासांनी दुपारी चार वाजता अधिकाऱयांनी तेथे छापा टाकला. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. पोलीस काय कारवाई करतात याकडे आमचे लक्ष असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.