जोगेश्वरी विधानसभेत मिंधे गटाचे खासदार रवींद्र वायकर, विधानसभा उमेदवार मनिषा वायकर यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप करून मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनंत नर आणि त्यांच्या सहकाऱयांनी मातोश्री क्लब येथे सुरू असलेल्या गैरकारभाराचा भंडाफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गद्दार मिंधे गटाचे कार्यकर्ते आणि भाडोत्री गुंड शिवसैनिकांच्या अंगावर धावून आले. यामुळे काही काळ तणाव होता.
जोगेश्वरी पूर्व विधानसभेत शिवसेना उमेदवार अनंत नर यांना समाजातील सर्व स्तरांतून मिळणारा मतदारांचा पाठिंबा आणि प्रचार यात्रांच्या झंझावातामुळे मिंधे गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या रवींद्र वायकर यांनी विधानसभा निवडणुकीत पत्नीला निवडून आणण्यासाठी मतदारसंघात राजरोसपणे आचारसंहितेचे उल्लंघन करून पैसे आणि गिफ्ट वाटप सुरू केले आहे. महिला बचत गट, छोटी मोठी मंडळे यांना पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न मागील आठवडाभरापासून मतदारसंघात सुरू आहे. हे प्रकार निवडणूक आयोगाचे स्थानिक अधिकारी तसेच पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून दिल्यावरही ठोस अशी कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.
मंगळवारी रात्री उशिरा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील मातोश्री क्लब येथे आचारसंहितेचा भंग करून सुरू असलेला गैरकारभार शिवसैनिकांनी समोर आणला. यामुळे बिथरलेल्या वायकर आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांशी राडा घातला. वायकर यांचे गुंड एवढय़ावरच थांबले नाहीत तर लाठय़ाकाठय़ा घेऊन शिवसैनिकांच्या अंगावर धावून आले तसेच दगडफेकही केली. घटनास्थळी मिंधे गटाच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित नसतानाही शिवसैनिकांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोलिसांसमोर गुंडागर्दी
मिंधे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या ताब्यात असलेल्या मातोश्री क्लब येथून निवडणूक काळात मोठय़ा प्रमाणात गैरकारभार सुरू आहेत. मंगळवारी रात्री पोलिसांसमोरच वायकर यांच्या भाडोत्री गुंडांनी शिवसैनिकांवर लाठय़ाकाठय़ांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
महिला बचत गट मेळाव्यात आचारसंहिता भंग
चार दिवसांपूर्वी भूतबंगला येथे स्वामी समर्थ महिला बचत गटाकडून मेळाव्याचे आयोजन करून महिलांना मिठाई व फेमीना कंपनीच्या फ्राय पॅनचे वाटप करण्यात आले. मिंधे गटाचे शाखाप्रमुख रुपेश उर्फ बंटी सावंत यांनी कोणतीही परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन तर केलेच त्याशिवाय मिंधे गटाच्या उमेदवाराने मतदारांना भेटवस्तूद्वारे प्रवृत्त करून आचारसंहितेचा भंग केल्याचे उघड झाले.