खात्यांवरून खदखद वाढली, शिंदेंची भाजपकडून कोंडी; गृह नाहीच… महसूल, जलसंपदा, बांधकाम यापैकी एकच खाते

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी आता खातेवाटपावरून तीन पक्षांमध्ये महाखदखद सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदासह गृहखात्यासाठी हट्ट धरला आहे. मात्र गृह सोडाच आता मलईदार खात्यांपैकी महसूल, सार्वजनिक बांधकाम किंवा जलसंपदा यापैकी एकच खाते देऊ असा निरोप शिंदेंना देण्यात आला आहे. भाजपकडून शिंदे यांची कोंडी करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळूनही राज्यात सत्तास्थापनेला मुहूर्त मिळत नव्हता. कारण एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी अडून बसले होते. गृह खाते न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम व राज्य रस्ते विकास महामंडळासाठी आग्रही आहेत. पण त्यांच्यापुढे जलसंपदा, महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खाते असे तीन पर्याय ठेवण्यात आले आहेत. या तीनपैकी एकच खाते देण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे. त्यांच्या गटातील काही आमदारांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता दुरावत चालली आहे. शिंदे गटातील काही वादग्रस्त व ‘कलंकित’ आमदारांना मंत्रीपद देऊ नये असा भाजपमध्ये मतप्रवाह आहे. त्यामुळे शिंदेंच्या अस्वस्थतेत भर पडली आहे.

मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपावर भाष्य केले. 11-12 डिसेंबरला खातेवाटप होईल असे त्यांनी सांगितले आहे, पण खातेवाटपावर अद्याप तीन पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. महायुतीच्या नेत्यांमध्ये खातेवाटपावरून महाबैठका सुरू आहेत. पण खातेवाटपावरून नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने पुन्हा एकदा भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होईल अशी चर्चा आहे. कोणती खाती मिळावीत यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांसह अजित पवार गटानेही मंत्रीपदांची यादी तयार केली आहे.

ऊर्जा खाते भाजपकडे

महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांची मागणी शिंदे गटाकडून होत आहे, पण या तीन खात्यांपैकी एकच खात्याचा पर्याय निवडण्यास भाजपकडून शिंदे गटाला सांगण्यात आले आहे. ऊर्जा खाते भाजपकडे जाण्याची चिन्हे आहेत.

वित्त खाते ‘दादां’ना देण्यास विरोध

खातेवाटपावरून तिढा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त खाते देऊ नये यासाठी शिंदे गटाचा दबाव आहे. कारण अजित पवार निधी देत नसल्याची शिंदे गटाची पूर्वीपासूनची तक्रार आहे. आताही वित्त खाते अजित पवार यांना दिल्यास शिंदे गटाची कोंडी होणार आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग चांगले जमले आहे. त्यामुळे शिंदेंच्या विरोधाला न जुमानता वित्त खाते अजित पवार यांनाच मिळणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

राहुल नार्वेकरांचे नाव आघाडीवर

महायुतीत विधानसभा अध्यक्षपद हे भाजपकडे राहणार असल्याने या पदासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय ज्येष्ठ सदस्य म्हणून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीकडे लक्ष

7 आणि 8 डिसेंबर अशा दोन दिवसांत आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण होईल.

सत्तार, सावंत, शिरसाट नकोच!

उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी भाजपने मिंध्यांना झुकवले. आता मिंध्यांवर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात घेऊ नये यासाठी भाजपने दबाव आणल्याची जोरदार चर्चा असून दीपक केसरकर यांच्या नावावरही भाजपने फुली मारल्याचे वृत्त आहे.

विधिमंडळाचे आजपासून विशेष अधिवेशन

287 आमदार घेणार शपथ कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष नव्या सरकारचा शपथविधीही झाल्यानंतर आता उद्या, शनिवारपासून राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. निवडून आलेल्या 287 सदस्यांना या अधिवेशनात शपथ दिली जाईल. दरम्यान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली असून त्यांना आज राज्यपालांनी शपथ दिली. कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देणार आहेत.