महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; मिंधे गटाचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटवले

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नगरचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटवल्यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सातपुते यांनी संघटना उभी केली नाही असा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मिंधे गटाचे शहर प्रमुख म्हणून दिलीप सातपुते यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. दोन वर्षापासून ते या पदावर कार्यरत होते. अचानक त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी जाहीर केला. दिलीप सातपुते यांनी नगर शहर प्रमुखाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी दोन वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची शाखा या ठिकाणी स्थापन केलेली नाही. तसेच पक्षाला जे काही अभिप्रेत आहे ते त्यांच्याकडून काम झाले नाही, म्हणून त्यांना या पदावरून दूर केले आहे. त्यांना पक्षातून काढून टाकलेले नाही, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. सातपुते यांच्या जागी सचिन जाधव यांची नियुक्ती केली असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही नियुक्ती पक्षाचे सचिव भाऊ चौधरी यांच्या आदेशाने झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बेबनाव झाल्याचे बोलले जात आहे. विजयासाठी ज्यांनी कामे केली नाहीत त्यांची माहिती भाजपकडून घेतली जात आहे. मित्र पक्षांमध्ये जर कोणी काम केले नसेल तर त्यांनाही अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. सातपुते यांना आज अचानकपणे पदावरून दूर केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवरचे राजकारण लक्षात घेता मोठा बदल घडला आहे. सातपुते यांना पक्षातील अंतर्गत कारण दिले असले तरी त्यांच्या हकालपट्टीला किंवा पदावरून दूर जाण्याला लोकसभेचीच निवडणुकीचे कारण आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. त्यामुळे आता दिलीप सातपुते नेमकी पुढे काय भूमिका घेतात याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.