
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पक्षांतर्गत वादामुळे एकमेकांचे चिमटे काढले जात आहेत. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर टीका करण्याची आयती संधी काँग्रेसला मिळाली. आजवर काँग्रेसवर टीका केली जायची. मात्र आता ती संधी भाजपने स्वतःच उपलब्ध करून दिली. हीच संधी साधत भाजपमधील भांडणांना अंतच दिसत नाही, असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांचे जोरदार चिमटे काढले. ते म्हणाले की, शिस्तीचा पक्ष म्हणून लौकिक मिरवणारे आता भांडणात दंग आहेत. काँग्रेसमधील भांडणे क्षणिक असतात, मात्र भाजपमधील भांडणांना अंतच दिसत नाही. डोक्यावरची कडक टोपी आता नरम झाली की काय, असे चित्र भाजपमध्ये निर्माण झाले आहे. हे चित्र असेच कायम राहो. भांडा सौख्यभरे, अशा शुभेच्छा आमच्या नेहमी राहतील, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. तर दुसरीकडे वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही काँग्रेसला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या घरात न बघता दुसऱ्याच्या घरात काय चाललंय, हे बघण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. त्यातूनच वडेट्टीवारांनी हे विधान केले असावे. या वृत्तीमुळेच काँग्रेस एवढ्या कमी जागांवर आली, असे मुनगंटीवार म्हणाले.