मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत मिंधे सरकारचा भेदभाव, मुस्लिम तीर्थक्षेत्रांचा समावेश नसल्याने नाराजी

ज्येष्ठ नागरिकांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मिंधे सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ वादाच्या भोवऱयात सापडली आहे. या योजनेत मुस्लिम धर्मीयांच्या तीर्थस्थानांचा समावेश नसल्याने मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे. हिंदूंसह जैन, पारशी, शीख, ज्यू धर्मीयांच्या तीर्थस्थळांचा या योजनेत समावेश आहे मग मुस्लिमांबद्दल दुजाभाव का, असा सवाल मुस्लिम बांधवांकडून व्यक्त होत आहे. तसेच शासन निर्णयात बदल करून मुस्लिम स्थळांचाही समावेश केला जावा, अशी मागणी केली जात आहे.

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सर्व धर्मीयांसाठी असूनही राज्यातील मुस्लिमांच्या एकाही पवित्र स्थळाचा त्यात समावेश का केला नाही? असा उद्विग्न सवाल समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. तसेच या योजनेच्या शासन निर्णयात बदल करून त्यामध्ये राज्यातील मुस्लिम धर्मीय पवित्र स्थळांचा समावेश करा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

हाजी अली, हाजी मलंगला हिंदूही जातात

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सुफी संतांचे राज्यात अनेक दर्गे आहेत. या दर्ग्यावर मुस्लिम धर्मीयांबरोबरच हिंदू बांधवसुद्धा जातात. हाजी मलंग, दिवाण शहा, माहीम, हाजी अली असे अनेक दर्गे राज्यात आहेत. यातील एकाही स्थळाचा समावेश या योजनेत का नाही, असा सवालही शेख यांनी उपस्थित केला आहे.