माजलगावसाठी जायकवाडीतून 100 क्युसेक्सचा विसर्ग; नदीकाठी सावधानतेचा इशारा

>> बद्रीनाथ खंडागळे, पैठण

“जायकवाडी”तून आजपासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेक्स याप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे गोदावरी नदिकाठासह कालवा परिसरातील रहिवाशी, पशुपालक व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. खबरदारी घ्यावी. असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.

दरम्यान जायकवाडीतील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ७८ पर्यंत पोहोचली असून नाथसागर जलाशयात ५१ हजार ७२६ क्युसेक्सची आवक चालूच आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजल्यापासून उजव्या कालव्यातून १०० क्युसेक्स याप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हळूहळू या विसर्गात वाढ केली जाणार आहे. या पाण्यातून माजलगाव धरण भरले जाणार आहे. नदिकाठावरील नागरिक, शेतकरी व पशुपालन करणाऱ्यांना सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर “नाथसागर” पुर्णक्षमतेने भरणार असल्याचे शुभसंकेत मिळाले आहेत. जायकवाडी धरणाची पुर्ण जलसंचय पातळी १५२२ आहे. सध्या धरणात १५१८ फुट पाणीपातळीची नोंद झाली असून धरण केवळ ४ फुटच रिकामे आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.