कारनामे बाहेर काढल्याने आपत्तीवाले घाबरले, पंतप्रधान मोदींची आपवर टीका

दिल्लीतील प्रदूषण, दारू घोटाळा, शाळा घोटाळा, शीशमहल या मुद्दय़ांवरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कारनामे बाहेर काढल्याने आपत्तीवाले घाबरले आहेत, असे ते म्हणाले. दिल्लीच्या आपत्ती सरकारकडे ना दूरदृष्टी आहे ना दिल्लीच्या लोकांची काळजी आहे. त्यांनी प्रत्येक हंगामाला आपत्तीत रूपांतरित केले. मी जेव्हा काळे पत्र सर्वांसमोर उघड केले तेव्हा त्यांना माझ्याबद्दल संताप येऊ लागला, असे मोदी म्हणाले.

आज रोहिणी येथे जपानी पार्कमध्ये त्यांनी 35 मिनिटांचे भाषण केले. ते म्हणाले, राजकारणात हेतू, निर्णय, धोरणे आणि निष्ठा यांना महत्त्व असते. प्रश्न आपत्तीवाल्या लोकांच्या हेतूचा आणि निष्ठsचा आहे. जनलोकपालच्या मुद्दय़ावर या पक्षाला जन्म दिला. भ्रष्टाचार हटवणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. या पक्षाच्या बहुतांश नेत्यांवर दारू घोटाळा, शाळा घोटाळा, प्रदूषणाविरोधात लढण्याच्या नावाखाली घोटाळा अशी कोरोडो रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत, असा आरोपही मोदींनी केला. यावेळी मोदींनी राजधानीत 12 हजार 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या योजनांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. त्यांनी दिल्ली गाझियाबाद-मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या साहिबाबाद ते न्यू अशोक नगर विभागाचे उद्घाटन केले. गेल्या 15 दिवसांतील त्यांचा दिल्लीतील हा तिसरा कार्यक्रम होता.