मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांच्या राहण्याची गैरसोय; कलिना येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह वापराविना

मुंबई विद्यापीठाच्या कलिना पॅम्पस येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे तत्कालीन कुलपती माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 8 जुलै 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हे वसतिगृह तत्काळ विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सुरू होणे अपेक्षित होते, मात्र आज 2 वर्षे उलटली तरीही हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यापीठात बाहेरगावाहून येणाऱया विद्यार्थ्यांच्या राहण्याची मोठी गैरसोय होत आहे.

कलिना कॅम्पस येथील वसतिगृहाची ओसी मिळाली असून वीज आणि पाणी जोडणीही पूर्ण झाली आहे. तरीदेखील ही इमारत धूळ खात पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे यांनी सोमवारी या वसतिगृहाची पाहणी करून संबंधित अधिकाऱयांना हे वसतिगृह कधी सुरू करणार अशी विचारणा केली असता विद्यापीठाकडून अद्याप फर्निचरचे काम होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. यावर युवसेनेने संताप व्यक्त करत फर्निचर करण्यासाठी 2 वर्षांचा वेळ लागतो का, असा सवाल उपस्थित केला.

वसतिगृहाचा खासगी वापर
वसतिगृहाच्या पार्किंगमध्ये 3 रिक्षा पार्क करण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील कर्मचाऱयांच्या गाडय़ा पार्किंग केल्या तर समजू शकतो, पण बाहेरील रिक्षा विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क करणे चुकीचे आहे, असे प्रदीप सावंत म्हणाले. मुंबई विद्यापीठाची 3 वसतिगृहे सध्या सुरू आहेत. मात्र ती विद्यार्थ्यांसाठी अपुरी पडत असून लवकरात लवकर हे वसतिगृह सुरू करण्यात यावे, अशी मागणी युवासेनेचे केली आहे.

– मुंबई पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार, शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत कलिना परिसर संबंधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व व्यवस्थित असल्याचे उत्तर दिले होते. तसेच अधिवेशन काळातच सरकारची एक कमिटी कलिना कॅम्पसची पाहणी करून अधिवेशनात अहवाल सादर करणार होते. मात्र आजातागायत ही कमिटी कॅम्पसची पाहणी करण्यासाठी आलेलीच नाही. त्यामुळे उद्या 30 जुलैला युवासेनेचे सिनेट सदस्य या प्रकरणी आमदार अनिल परब यांची भेट घेणार आहेत.