भाजप आणि काँग्रेसच्या थेट लढतीत काँग्रेसला फटका, काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 75 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. त्यात भाजपने 65 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 10 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे ज्या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली. या थेट लढतीचा काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसून येते.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 101 जागा लढवल्या, पण काँग्रेसला 20 जागांचा टप्पा पार करता आला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘संविधान बचाव’चा नारा देत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली होती. पण विधानसभा निवडणुकीत तसे झाले नाही.

विधानसभेला 75 मतदारासंघांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. त्यात काँग्रेसला मोठा फटका बसला. परिणामी पक्षाचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, नसीम खान, संग्राम थोपटे, धीरज देशमुख, के.सी. पाडवी, सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना पराभव पत्करावा लागला. कोकणात काँग्रेसचा एकही आमदार नाही. उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात काँग्रेसचा प्रत्येक एक आमदार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विधानसभा निवडणुकीत अवघ्या 208 मतांनी निसटता विजय झाला आहे.

या विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 132 जागा जिंकल्या आहेत. 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या होत्या. मात्र आतापर्यंतची काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील कामगिरी चिंताजनक ठरली आहे. 2014 मध्ये काँग्रेसने 42 जागा, 2019 मध्ये काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या, पण यंदा काँग्रेसचे संख्याबळ 16वर आले आहे.