
हरयाणातील हिसार येथील वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बूरा आणि तिचा पती हिंदुस्थानच्या कबड्डी संघाचा माजी कर्णधार व भाजप नेता दीपक हुड्डा यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. यापूर्वीही स्वीटीने तिच्या नवऱ्यावर अनेक आरोप केले होते. आता पुन्हा एकदा तिने दीपक हुड्डाबाबात धक्कादायक दावे केले आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नवऱ्याच्या अशा विचित्र कृत्यामुळे स्वीटी हैराण झाली होती. यादरम्यान झालेल्या मनस्तापामुळे स्वीटीला पॅनिक अॅटॅक आला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून घरी आल्यावर स्वीटीने पुन्हा एकदा नवऱ्यावरील आरोपांचा पाढा वाचला. माझा नवरा मला खूप मारहाण करायचा आणि या संदर्भातील सगळे पुरावे माझ्याकडे असल्याचे तिने म्हटले आहे.
माझा नवरा दीपक हुड्डा मला विवस्त्र करून रात्रभर मारहाण करायचा. अनेकदा उशीने माझं तोंड दाबून मला बुक्के मारायचा. या मारहाणीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्याने माझं घराबाहेर पडणं बंद करून टाकलं होतं. मला पाच पाच दिवस घरातच कोंडून ठेवायचा. मी कोणाशी संपर्क करू नये यासाठी माझा मोबाईलही त्याने जप्त केला होता, असे तिने यावेळी सांगितले.
स्वीटीने यापूर्वी दीपकवर समलैंगिक असल्याचा आरोप केला होता. याचा व्हिडीओ तिने स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. दीपकच्या समलैंगिक संबंधांचे व्हिडीओ आपण पाहिल्याचे ती सांगितले. याआधी मी सगळं सहन केलं. मात्र आता मी गप्प बसणार नाहीए, असा इशाराही तिने दिला.