अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा विक्रमी सहभाग आणि पीळदार सागर उसळलेल्या ‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेवर परब फिटनेसच्या दिनेश राठोडने बाजी मारली. त्याने आपल्यापेक्षा वरच्या गटात ठरलेल्या विजेत्यांवर अत्यंत चुरशीच्या लढतीत मात करीत मुंबई शरीरसौष्ठवाचे सर्वात उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे ‘नवोदित मुंबई श्री’चे जेतेपद संपादले. स्ट्रेंथ जिमचा हितेन तामोरे उपविजेता ठरला.
दिंडीतल्या वारकऱयांना जशी विठू माऊलीच्या दर्शनाची आस जशी लागलेली असते तशीच आस नवोदित शरीरसौष्ठवपटूंना या स्पर्धेची लागली होती. त्यामुळे परळच्या कामगार मैदानात आपले पीळदार स्नायू दाखवण्यासाठी तब्बल 280 स्पर्धकांची विक्रमी उपस्थिती लाभल्याने आयोजक आणि संघटनेच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता. जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठअया संख्येने स्पर्धक उतरले होते. प्रत्येक गटात 40 पेक्षा अधिक स्पर्धक असलेल्या या स्पर्धेत 60 किलो वजनी गटात स्पर्धकांच्या अभूतपूर्व सहभागाचे अर्धशतक ओलांडले होते. स्पर्धकांची उपस्थिती इतकी प्रचंड होती की, भव्यदिव्य स्टेजही अपुरा पडत होता.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेला खरी ताकद लाभली ती आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विक्रांत देसाईची. शरीरसौष्ठवावर असलेल्या प्रेमापोटी त्यानेच या स्पर्धेचे शिवधनुष्य लीलया पेलले आणि एका दिमाखदार स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये जबरदस्त क्रेझ असल्याचे स्पर्धेच्या अभूतपूर्व गर्दीवरून दिसून आले. प्रत्येक गटात 40 पेक्षा अधिक खेळाडू असल्यामुळे गटातील अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना फार कष्ट घ्यावे लागले.
स्पर्धेचा प्रत्येक गट आव्हानात्मक होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या 55 किलो वजनी गटात अनंत व्यायामशाळेचा सय्यद शाहवेज, 60 किलो वजनी गटात बॉडीवर्क शॉप दुर्गेश मेहेर सरस ठरला. 65 किलोत मसल एम्पायरचा रोहित यादव अव्वल आला तर 70 किलो वजनी गटात स्ट्रेंथ जिमच्या हितेन तामोरेने बाजी मारली. पुढच्या तिन्ही गटांत गटविजेतेपदासाठी काँटे की टक्कर झाली. ज्यात वाली अन्सारी, दिनेश राठोड आणि गणेश म्हाब्दी पहिले आले.
‘नवोदित मुंबई श्री’ निकाल
55 किलो ः 1. सय्यद शाहवेज (अनंत व्या.), 2. विनय घाडीगावकर (राज जिम), 3. दर्शन सावंत (क्लाऊड नाईन); 60 किलो ः 1. दुर्गेश मेहेर (बॉडीवर्क शॉप), 2. नईम सय्यद (परब फिटनेस), 3. शुभम अडांगळे (माँसाहेब); 65 किलो ः 1. रोहित यादव (मसल एम्पायर), 2. संतोष घाटाळ (बॉडीवर्क शॉप), 3. अदनान तिवारी (बाल मित्र जिम); 70 किलो ः 1. हितेन तामोरे (स्ट्रेंथ जिम), 2. लक्ष्मण पाटील (एस. पी. फिटनेस), 3. दर्शन सणस (जय भवानी जिम); 75 किलोः 1. वाली अन्सारी (परब फिटनेस), 2.मनीष वाघेला (आयर्न पॅराडाईज), 3. रोशन पांडा (परब फिटनेस); 80 किलोः 1. दीपेश राठोड (परब फिटनेस), 2. दीपेश कलमकर (माँसाहेब), 3. ओमकार कालके (फिटनेस पॉइंट); 80 किलोवरील ः 1. गणेश म्हाब्दी (अनंत जिम), 2. नीलेश रेमजे (परब फिटनेस), 3. इरफान रेमजे ( बालमित्र जिम).
किताब विजेता – दिनेश राठोड (परब फिटनेस), उपविजेता – हितेन तामोरे (स्ट्रेंथ जिम).
विजेतेपदासाठी रंगली ‘कांटे की टक्कर’
‘नवोदित मुंबई श्री’चा किताब जिंकण्यासाठी झालेल्या लढतीत टॉपचे चार गट जबरदस्त होते. यात दिनेश राठोड, गणेश म्हाब्दी, हितेन तामोरे, रोहित यादव यांच्यात जोरदार पीळदार चुरस पाहायला मिळाली. अखेर दिनेशने हितेनवर मात करत आपले संस्मरणीय जेतेपद संपादले. स्पर्धेच्या विजेत्याला ‘नवोदित मुंबई श्री’च्या किताबासह 21 हजारांचे रोख इनाम मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, किट्टी फणसेका, सुनील शेगडे आणि आयोजक विक्रांत देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा अमोल कीर्तिकर, शिवडी विधानसभा समन्वयक सुधीर साळवी आणि नाना आंबोले यांनीही खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी उपस्थिती लावली.