गेल्या काही महिन्यांपासून दिंडोशी विधानसभा क्षेत्रात अनियमित, अपुरा आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने त्रस्त रहिवाशांनी आज महापालिका पी-पूर्व विभाग कार्यालयावर रिकामे हंडे, कळशा, घागर घेऊन शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, पाणी नाही नळाला, महापालिका कशाला? महापालिका हाय हायच्या घोषणा देत मोर्चा पालिका विभाग कार्यालयावर धडकला. आमदार सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत लवकर पाणीप्रश्न सोडवा नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.
मोर्चानंतर विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सुनील प्रभू यांनी पी-पूर्वचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, मुख्य जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे, उपायुक्त विशेष अभियांत्रिकी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून सूचना केल्या. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱयांनी दिले. मोर्चात विधानसभा संघटक प्रशांत कदम, रीना सुर्वे, पूजा चौहान, माजी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, भाई परब, गणपत वारीसे, रुचिता आरोसकर, विद्या गावडे, सानिका शिरगावकर यांच्यासह मोठय़ा प्रमाणात रहिवासी सहभागी झाले होते.
रहिवासी त्रस्त
दिंडोशी विधानसभा क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पाण्याच्या वेळादेखील निश्चित नाहीत तसेच अपुरा पाणीपुरवठा होतो. या सर्वांचा ताण रहिवाशांवर येत असून पाण्यावरून रहिवाशांची आपापसात भांडणे होतात. काही ठिकाणी पाणी आल्यानंतर 10 ते 15 मिनिटे पाणीपुरवठा होतो. त्यानंतर एक ते दीड तास पाणीपुरवठा होतच नाही तर काही वेळासाठी पाणी येते आणि पुरवठा बंद होतो. यामुळे रहिवासी त्रस्त आहेत.
…तर ठिय्या आंदोलन
हा जनप्रक्षोभ मोर्चा आहे. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिका विभाग कार्यालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केले जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला पोलीस प्रशासन, सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा आमदार सुनील प्रभू यांनी दिला.