
दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करा, रस्ता रुंदीकरण आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तत्काळ सुधारा, अशी सूचना शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई महापालिकेच्या पी-उत्तर विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांबरोबर आज झालेल्या आढावा बैठकीत केली.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांसंदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी आज पी-उत्तर विभाग कार्यालयात उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त पी-उत्तर किरण दिघावकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. या बैठकीदरम्यान प्रभू यांनी दिंडोशी विभागातील नालेसफाई करण्याच्या सूचना दिल्या. गॅरंटी काळातील रस्त्यांवरील तसेच इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे संस्कार कॉलेज येथील डीपी रस्ता खुला करण्याच्या कामाची माहिती घेऊन पात्र बाधितांचे पुनवर्सन लगतच्या परिसरात करण्याच्या सूचना दिल्या. राणी सती मार्ग रुंदीकरणात बाधित घरांबाबत चर्चा केली. त्याचबरोबर अप्पा पाडा क्रांतीनगर परिसरात होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ाबाबत चर्चा केली. यावेळी माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख गणपत वारिसे, परिरक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग, इमारत व कारखाने विभागातील अधिकारी, पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकारी, रस्ते विभागाचे अधिकारी उपस्थित होते.