
तू गोरी आहेस, सुंदर दिसतेस, असा मेसेज महिलेला पाठवणे म्हणजे विनयभंगच, असे नमूद करत दिंडोशी सत्र न्यायालयाने एका आरोपीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. कोणतीही महिला व विवाहित पुरुष असे व्हॉट्सअप सहन करणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
एका महिलेने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत स्थानिक न्यायालयाने आरोपीला तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात आरोपीने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. दिंडोशी न्यायालयाने अपील फेटाळून लावत आरोपीची शिक्षा कायम केली. असे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे असतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
महिला खोट बोलणार नाही
राजकीय रागातून मला या प्रकरणात अडकवले आहे, असा दावा आरोपीने केला होता. अशा प्रकारे खोटे बोलून कोणतीही महिला स्वतःची बदनामी करून घेणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण…
आरोपी महिलेला रात्रीचे व्हॉट्सअप मेसेज करायचा. तू गोरी आहेस. खूप सुंदर दिसतेस. मी 40 वर्षांचा आहे. तू मला आवडतेस. तू सडपातळ आहेस. तुझे लग्न झाले आहे का? असे मेसेज करत तो तिला फोटो आणि व्हिडिओ पाठवायचा. याची महिलेने पोलिसांत तक्रार केली. आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल झाले. याचा खटला चालला. स्थानिक न्यायालयाने 2022मध्ये आरोपीला दोषी धरत शिक्षा ठोठावली.