
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली. याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत शहराध्यक्षांना पत्र लिहिले. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीदेखील त्यांना प्रत्युत्तर दिले. यावरून शहर भाजपमधील कोल्डवॉर समोर आले होते.
या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या चिंतन बैठकीत शहरातील नेत्यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेतल्याने मेधा कुलकर्णी एकटय़ा पडल्याने बैठकीतून निघून गेल्या. मेधा कुलकर्णी यांना पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे त्या निघून गेल्या असे सांगण्यात आले. भाजपच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनावरून झालेल्या वादावर बैठकीत चर्चा झाली. कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर त्यावर आंदोलन करणे, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मात्र त्यावर पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका होणे योग्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मुरलीधर मोहोळ यांनी महिला आघाडीच्या आंदोलनाचे समर्थन केले.