रुग्णाला जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता; दीनानाथ रुग्णालयाचे स्पष्टीकरण

रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारे आरोप करण्यात येत आहेत. वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला रुग्णाला दिला होता; मात्र त्यांनी तो पाळला नसल्याचे दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.

या समितीचा अहवाल आरोग्य विभागाला पाठविला आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुजा जोशी, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. समीर जोग, प्रशासक सचिन व्यवहारे यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. तनिषा भिसे 2020 पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी येत होत्या. त्यांच्यावर 2022 मध्ये एक शस्त्रक्रियाही झाली असून, त्यामध्ये त्यांना खर्चाच्या 50 टक्के सूट देण्यात आली. सुखरूप गर्भधारणा आणि प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला 2023 मध्ये दिला होता. सर्व रुग्णालयांच्या नियमांनुसार आई आणि बाळाच्या सुरक्षेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी किमान तीन वेळा करून घेणे आवश्यक असते. ही तपासणी त्यांनी दीनानाथ रुग्णालयात केलेली नाही. तसेच या तपासणीची माहिती रुग्णालयाला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

15  मार्च रोजी गर्भवती महिला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉ. सुश्रुत घैसास यांना भेटली होती. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉ. घैसास यांनी त्यांना माहिती दिली. तसेच त्यांना दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु, त्या तपासणीसाठी आल्या नाहीत. 28 मार्च रोजी महिला रुग्णालयात आली, तेव्हा तिला तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. मात्र, त्यांना प्रसूती धोक्याची असल्याची माहिती दिली होती. प्रसूतीनंतर बालकांना एनआयसीयूमध्ये उपचार द्यावे लागतील, त्यासाठी 10 ते 20 लाखांचा खर्च येऊ शकतो, याची माहिती रुग्णाला दिली होती.

रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. केळकर यांना फोन करून अडचण सांगितली. त्यावर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा असे सांगितले. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी सचिव व्यवहारे यांना फोन केला. मात्र, रुग्णाचे नातेवाईक चॅरिटी विभागात कोणालाही भेटले नाहीत. काही वेळाने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक निघून गेल्याचे नर्सने सांगितल्याचेही रुग्णालयाच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.