
>> दिलीप ठाकूर
विद्या बालनने मराठमोळ्या रूपात सादर केलेलं `खंडेरायाच्या लग्नाला…’ या गाण्यावरील नृत्याचे रील सध्या तुफान लोकप्रिय झाले आहेत. गीत, संगीत, नृत्यात कधी मराठीचा ठसका, तर कधी अन्य भाषेचा तडका असणारी गाणी, रील्स सादर करणं आणि रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस ते उतरणं नवं नाही. या क्रिएटिव्हिटीचा घेतलेला हा वेध.
एव्हाना तुम्हीदेखील विद्या बालनचे `खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली…’ या गाण्यावरचे नृत्याचे रील पाहिले असणार आणि त्याला नक्कीच लाईक केले असणार. ऑरेंज रंगाची साडी, मोठे इअरिंग्ज आणि कपाळावर चंद्रकोर… अशा मराठमोळ्या रूपात विद्या बालनने नृत्याचा मनमुराद आनंद घेतलाय आणि ते नृत्य पाहणारे रसिकही आनंद घेत आहेत. सोशल मीडियाच्या युगात अशी क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा नवा रंगतदार फंडा म्हणा, तसा करावासा वाटणे यात आश्चर्य नाही. गीत, संगीत व नृत्यात असे आगळय़ावेगळय़ा रील्स तर केव्हापासून सुरू आहेत. त्यात कधी मराठीचा ठसका असतो तर कधी अन्य भाषेचा तडका.
अशा मराठमोळय़ा नऊवारी साडीतल्या रूपात शबाना आझमी, परवीन बाबी, झीनत अमान यांनीही `लवंगी मिरची’ (चित्रपट `अशांती’) लावणी नृत्याचा ठेका दाखवला होता. त्यांनी असे काही आगळेवेगळे नृत्य करावे हे कौतुकास्पद आहे. `कहानी किस्मत की’मध्ये `रफ्ता रफ्ता देखो आंख मेरी लडी है’ या धमाल गाण्यात अखेरीला धर्मेंद्र व रेखाचे महाराष्ट्रीय शेतकरी रूप आणि `पांडोबा पोरगी फसली रे फसली’चा ठेचा फारच लोकप्रिय ठरला. `इन्कार’च्या `ओ मुंगळा ओ मुंगळा’ या दारूच्या गुत्त्यातले गीत, नृत्याचा मुखडा मराठी वळणाचा आणि हेलनने काष्टी साडीत नाचणे हेही मराठमोळेच होते. `मै खिलाडी तू अनाडी’ गाण्यातही `पोरगी आली आली’ असा मराठी शब्दांचा मस्त वापर केला गेला. अशी मराठीचा छान वापर असलेली अनेक गाणी आहेत. `कोंबडी पळाली’चेच (जत्रा) हिंदीत `चिकनी चमेली’ (अग्निपथ) झाले. कतरिना कैफने मराठमोळ्या रूपात नृत्य रंगवले. (ते काहीसे भडक होते.)
अन्य भाषेतील गाण्यातही असे आगळेवेगळे घडले आहे. आपल्याकडचा मसालेदार मनोरंजक चित्रपट म्हणजे एक प्रकारचे सेलिब्रेशन, सोहळा वा मनसोक्त आनंद घेणे हेच असते. कधी पटकथेतील जागा कायम ठेवून तर कधी पटकथेत चक्क मोकळीक घेऊन एखाद्या गाण्याचा काहीतरी अजबगजब मुखडा असा काही असतो की, त्याचा अर्थ शोधला तरच सापडतो.
`केरिदा केरिदो’ म्हणजे नेमके काय माहित्येय? हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? त्याचा अर्थ काय? `गर्लफ्रेंड’ या मराठी चित्रपटात याच मुखडय़ावरून `युथफुल जोशफुल’ प्रकार पाहायला मिळाला. पडद्यावर हे गाणे अमेय वाघ आणि सई ताम्हणकर या जोडीने साकारले आहे. हा खरे तर स्पॅनिश शब्द! `केरिदा’ म्हणजे `प्रिये’ आणि `केरिदो’ म्हणजे `प्रिय’ असा त्याचा अर्थ होतो. आजच्या डिजिटल पिढीला अशा अनेक प्रादेशिक आणि विदेशी शब्दांची कल्पना आहे. आजच्या ग्लोबल युगातील शहरी जीवनात अनेक भाषांतील असे अनेक शब्द एकमेकांत मिसळून जात एक नवीन कॉम्बिनेशन जन्माला येण्याचे प्रमाण वाढत आहे. आजच्या युवा पिढीला असे `मिक्स कल्चर’ भारी आवडते. यूटय़ूबपासून क्लब ते पबपर्यंत अशा रापचिक गाण्यांना लाइक्स मिळत आहेत हे विशेष.
पडद्यावरची ही करामत सोशल मीडियात रील्सपर्यंत आली आहे. अनेक मराठी अभिनेत्री जुन्या लोकप्रिय मराठी व हिंदी गाण्यांवरचे डान्स रील्स पोस्ट करतात. त्याला भरपूर लाइक्स, कॉमेन्टस् मिळतात. आजच्या वेगवान आयुष्यात काही आगळंवेगळं निराळं पाहण्यात, ऐकण्यात, सांगण्यात अनेकांना रस आहे. विद्या बालनने नेमके हेच केले आणि म्हणूनच तुम्ही ते पाहिलेत.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)