सिनेविश्व – चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील वाढती रंगत

>> दिलीप ठाकूर

पुरस्कार म्हणजे प्रोत्साहन, आनंद, शाबासकीची थाप असं बरंच काही असतं. सध्या मनोरंजन क्षेत्रात जवळपास वर्षभर पुरस्कार सोहळे रंगत असतात. असा पुरस्कार सोहळा म्हणजे जणू एक छानसा मेळा. एकमेकांना भेटण्याची, हस्तांदोलन, गळाभेटीची संधी. सोशल मीडियाच्या युगात प्रत्यक्षात भेटणं, बोलणं, ऐकणं, सांगणं दुर्मिळ झालेलं आहे. त्यात असे भेटण्याचे, आनंद व्यक्त करण्याचे योग नक्कीच सकारात्मक आहेत.

सर्वप्रथम नामांकन जाहीर, मग चित्रपट पुरस्कार सोहळ्याची जागा (उघड्या मैदानात वा मोठ्या जागेत पाहुण्यांची मुबलक गर्दी), रेडकार्पेटवर सेलिब्रिटीजचं छान हसत चालणं, त्यात काहींचे लेटेस्ट मॉडेलच्या कारमधून उतरणं (त्याचे सोशल मीडियात होणारे रील्स, त्याला वाढते लाईक्स), पुरस्कारासाठी आपलं नाव घेतलं जाईल ना याची उत्सुकता, नाव जाहीर होताच

कॅमेऱयाने टिपलेला उत्स्फूर्त चेहरा, पुरस्कार मिळाल्याचा मनोमन आनंद, आपण इतरांवर मात करत तो पटकावलाय ही एक पूर्ण झालेली सुप्त इच्छा. स्पर्धेच्या युगात असं असेल तर त्यात आश्चर्य ते काय?

आज विलक्षण विस्तारलेल्या मनोरंजन क्षेत्रात जवळपास वर्षभर पुरस्कार सोहळे रंगत असतात. चित्रपट, रंगभूभी, दैनंदिन मालिका, टीव्ही शो, ओटीटी, लघुपट, माहितीपट, अनुबोधपट, रील स्टार असे करता करता भविष्यात उत्तम रॅम्प वॉक, नव्या ट्रेंडचा पेहराव, जाहिरातपट अशी व्याप्ती झाल्याने आश्चर्य नाही. पुरस्कार सोहळा म्हणजे जणू एक छानसा मेळा. एकमेकांना भेटण्याची, हस्तांदोलन, गळाभेटीची संधी. सोशल मीडियाच्या युगात प्रत्यक्षात भेटणं, बोलणं, ऐकणं, सांगणं दुर्मिळ झालेलं आहे. त्यात असा भेटण्याचा योग नक्कीच सकारात्मक.

काही कलाकारांच्या घरी अनेक प्रकारचे पुरस्कार, चित्रपट महोत्सवाची स्मृतिचिन्हं पाहताच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रत्यय येतो. सुलोचनादीदींच्या प्रभादेवी येथील घरात पाऊल टाकताच अनेक पुरस्कार लक्ष वेधणारे असायचे. राजेश खन्नाच्या खार येथील प्रशस्त कार्यालयात एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत काचेच्या तीन-चार शेल्फवर पुरस्कार असायचे. याला म्हणतात यश! गजेंद्र अहिरेच्या घरातील पुरस्कारांची ठेवण त्याच्यातील ािढएटिव्हिटी दाखवते.

पुरस्कार सोहळ्याबद्दल सहज थोडंसं सांगायचं तर मनोरंजनाच्या पॅकेजमध्ये थोडासा फ्लॅशबॅक अपेक्षित असतो. 2025 हे अनेक महत्त्वाच्या मराठी व हिंदी चित्रपटांचं पन्नासावं वर्ष आहे. सामना, पांडू हवालदार, चंदनाची चोळी अंग अंग जाळा, झुंज, या सुखांनो या… मराठीत तर हिंदीत दीवार, शोले, प्रेम कहानी, आंधी, खुशबू, मौसम, फरार, धर्मात्मा, धरम करम, प्रतिज्ञा, चुपके चुपके, जय संतोषी मां… अशी अनेक चित्रपटांची ही पन्नाशी.

काही सिनेमावाल्यांचं जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झालंय, काहींचं सुरू आहे, काहींचं सुरू होईल. त्यांच्यावरचे माहितीपट बरंच काही सांगणारे ठरतील. अशी काही नावं सांगायची तर राज कपूर, मोहम्मद रफी, तलत मेहमूद, राम मराठे, तपन सिन्हा, राम गबाले, सचिन शंकर, धरम चोप्रा, नासिर खान, इंदिवर, गुलशन रॉय, रेहमान, मदन मोहन इत्यादी. 31 मे रोजी दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असतानाच त्यांच्यावर इंग्लिशमध्ये पुस्तक प्रकाशित होत आहे. 9 जुलै रोजी गुरुदत्त यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. यातील अनेकांच्या चित्रपटांचा महोत्सव आयोजित झाल्यास उत्तम. राज कपूर चित्रपट महोत्सवात `मेरा नाम जोकर’ मूळ दोन मध्यांतरासह चार तास नऊ मिनिटांचा आणि `संगम’ दोन मध्यांतरासह चार तासांचा दाखवला गेला. आजच्या तरुणाईने  या दोन्ही चित्रपटांना प्रतिसाद दिला. हिंदीचा एखादा पुरस्कार सोहळा दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात व्हायला काय हरकत आहे? हे सगळेच चित्रपटावरील प्रेमाखातर व एका विशिष्ट चौकटीतून थोडंसं बाहेर पडण्यासाठीच सांगतोय. चित्रपट म्हणजे दीर्घकालीन प्रवास आणि त्याला अनेक कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांचा हातभार, तो बहुस्तरीय नक्कीच आहे. पुरस्कार म्हणजे प्रोत्साहन आणि ते मिळणं कलाकाराच्या दृष्टीने अनमोल आहे.

[email protected]

(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)