
पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे सध्या राजकारण व्यतिरिक्त एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. दिलीप घोष लग्न बंधनात अडकणार आहेत. घोष वयाच्या 60 व्या वर्षी पहिल्यांदाच बोहल्यावर चढणार आहेत. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी रिंकी मजुमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत.
दिलीप घोष यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. यानंतर 41 वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्न सोहळ्यासाठी फक्त दिलीप घोष आणि रिंकी यांचे कुटुंबीय उपस्थित असतील.
कोण आहेत रिंकी मजूमदार
दिलीप घोष यांच्यासारख्याच रिंकी देखील राजकारणात सक्रिय आहेत. रिंकी या भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत. रिंकी यांचे वय 50 वर्ष असून त्या घटस्फोटीत आहे. रिंकी यांना एक मुलगा (25) असून तो आयटी क्षेत्रात काम करतो. घोष आणि रिंकी मजूमदार हे एकाच पक्षात असून एकाच परिसरात राहतात.
दिलीप घोष भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना एका कार्यक्रमादरम्यान त्यांची रिंकी मजुमदारशी भेट झाली. दिलीप घोष यांच्या सांगण्यावरून रिंकी मजुमदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2021मध्ये रिंकी यांची दिलीप घोषशी मैत्री झाली आणि नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिलीप घोष खूप निराश होते, तेव्हा रिंकी मजुमदार यांनी दिलीप घोष यांना लग्नाचा प्रस्ताव दिला.
रिंकी मजुमदार यांना दिलीप यांच्यासोबत लग्न करून संसार सुरू करायचा होता. मात्र त्यावेळी दिलीप घोष यांनी लग्नासाठी नकार दिला होता. परंतु नंतर त्यांच्या आईच्या आग्रहास्तव दिलीप घोष यांनी लग्न करण्यास होकार दिला.