डिजिटल अटक, टास्कच्या नावाने फसवणूक सुरूच

डिजिटल अटक आणि टास्कच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याच्या तीन घटना शहरात घडल्या. या प्रकरणी मालाड, वर्सोवा आणि बोरिवली पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.

मालाड येथे तक्रारदार सेवानिवृत्त आहेत. शनिवारी त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱयाने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवले. एकाने तुमच्या नावाचे आधार कार्ड वापरून बँकेत खाते उघडले आहे ज्यामध्ये मनी लॉण्डरिंग झाली आहे. मनी लॉण्डरिंग झाल्याने तुम्हाला अटक करत आहेत, अशी भीती दाखवली. त्यानंतर ठगाने त्यांना व्हिडीओ कॉल केला. तेव्हा पोलिसांचा गणवेश घातलेला व्यक्ती बोलत होता. त्याने अटक न करण्यासाठी 10 लाखांची मागणी केली. भीतीपोटी तक्रारदार याने 8.6 लाख रुपये विविध खात्यांत ट्रान्सफर केले. सायंकाळी त्याची मुलगी घरी आली तेव्हा त्याने घडल्या प्रकाराची माहिती मुलीला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

बोरिवली येथे ठगाने तक्रारदाराला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले. लालसेपोटी तक्रारदार याने 5.78 लाख रुपये गुंतवले. तिने नफा झालेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम निघत नव्हती. तेव्हा ठगाने टेलिग्रामवर ब्लॉक केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

वर्सोवाच्या यारी रोड येथे फोन करणाऱ्याने तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवले. हे प्रकरण मनी लॉण्डरिंगचे असल्याने त्याचा तपास सीबीआय करत आहे, अशी ठगाने तक्रारदार यांना भीती दाखवली. चौकशीचा बहाणा करून डिजिटल अटक झाल्याचे सांगितले. कारवाईची भीती दाखवून ठगाने तक्रारदार यांच्याकडून सहा लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वर्सोवा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.